बायकोशी झालेल्या तुफान वादातून पतीचा 'हाय व्होल्टेज' ड्रामा! पाण्याच्या टाकीवर चढला, पण पुढे काय झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:00 IST2025-12-10T10:00:06+5:302025-12-10T10:00:32+5:30
बायकोशी भांडला! संतापलेला पती नशेत थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन्..

AI Generated Image
कौटुंबिक वादातून एका पतीने अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याने सहारनपूरमध्ये मोठा गोंधळ उडाला. पत्नीसोबत झालेल्या जोरदार भांडणामुळे संतापलेल्या या तरुणाने चक्क एका उंच पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण, प्रसंगावधान राखून देहात कोतवाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि या युवकाला सुखरूप खाली उतरवण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सहारनपूरच्या देहात कोतवाली हद्दीतील काशीराम कॉलनी परिसरात ही घटना घडली. पाण्याच्या टाकीवर एक युवक चढल्याची माहिती मिळताच रस्त्यावरील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. बघता बघता या परिसरात मोठी गर्दी जमली. लोकांनी या घटनेचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या टाकीवर चढलेला हा युवक शेखपुरा कदीम येथील रहिवासी शुभम आहे. ८ तारखेच्या रात्री त्याचे पत्नीसोबत जोरदार घरगुती भांडण झाले. या वादातूनच शुभमने दारूच्या नशेत रागाच्या भरात हे धोकादायक पाऊल उचलले आणि थेट पाण्याच्या टाकीवर चढला.
पोलिसांची समजूतदार भूमिका ठरली महत्त्वाची!
घटनेची माहिती मिळताच देहात कोतवाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. गर्दी आणि युवक नशेच्या अवस्थेत असल्याने परिस्थिती नाजूक होती. मात्र, पोलीस अधिकारी सीओ मनोज यादव यांनी त्वरीत सूत्रे हाती घेतली. सीओ मनोज यादव यांनी सांगितले की, "युवक दारूच्या नशेत आणि प्रचंड तणावात होता. आम्ही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले. कोणताही धोका न पत्करता अत्यंत संयमाने त्याला शांत केले आणि त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले."
समुपदेशनाने मिटवले भांडण
युवकाला खाली उतरवल्यानंतर पोलिसांनी केवळ कारवाई करून विषय थांबवला नाही, तर त्यापुढचा महत्त्वाचा टप्पा पार केला. देहात कोतवाली पोलिसांनी पती-पत्नी दोघांचेही समुपदेशन केले. भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी दोघांनाही शांतता राखण्याचा आणि सामंजस्याने वागण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर शुभमला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण घटनेत पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि समजूतदारपणा यामुळेच एका युवकाचा जीव वाचू शकला, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.