नवरा-बायकोच्या भांडणात दोन कुटुंबातील दोघांच्या आत्महत्या, एकाच दिवशी चौघांच्या मृत्यूने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 21:59 IST2020-10-04T21:58:33+5:302020-10-04T21:59:07+5:30
पती-पत्नीच्या भांडणात दोन वेगवेगळ्या परिवारात दोन आत्महत्या झाल्या.

नवरा-बायकोच्या भांडणात दोन कुटुंबातील दोघांच्या आत्महत्या, एकाच दिवशी चौघांच्या मृत्यूने खळबळ
राजगुरूनगर: पती-पत्नीच्या भांडणात दोन वेगवेगळ्या परिवारात दोन आत्महत्या झाल्या. यातील खेड एसटी बस स्थानकालगत आनंदनगर हरेश्वर बिल्डीगमध्ये घडलेल्या घटनेत योगिता अमित बागल, ३२ , (मुळ रा.पेठ,ता आंबेगाव) या विवाहितेने आत्महत्येपूर्वी आपल्या काव्या (वय दीड वर्ष) या लहान मुलीला साडीच्या पदराने फासावर लटकावून आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. तसेच पत्नीशी वारंवार होणाऱ्या भांडणाचा राग अनावर झाल्याने चेतन लहू रोडे , याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याशिवाय राजगुरूनगर येथील तिन्हेवाडी रस्त्यालगत वास्तव्य असलेल्या व उत्तर प्रदेशातुन रोजंदारी करायला आलेल्या पुजा पप्पु चव्हाण,वय २० या विवाहितेचा अकस्मात पण संशयास्पद मृत्यु झाल्याची माहिती खेडचे पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी दिली.
रविवारी(दि ४) एकाच दिवशी तीन घटनांमध्ये लहान मुलीसह चार व्यक्ती मृत्यु झाले आहे. तीन घटनांमध्ये लहान मुलीसह चार व्यक्ती मृत्यु पावल्याने शहर परिसरात खळबळ उडाली आहे.नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार राजगुरूनगरच्या आनंदनगर भागात आत्महत्या केलेल्या विवाहितेचा पती किराणा दुकानदार असुन त्याला दारूचे व्यसन असल्याने दोघांचे नेहमीच भांडण होत असे. काल रात्री उशिरा दोघांमध्ये भांडण झाले. त्यांनंतर पती घराबाहेर निघुन गेला. तो सकाळी परत येऊन दरवाजा उघडण्यासाठी विनवण्या करीत होता. मात्र आतून प्रतिसाद मिळत नव्हता. नेहमीचे झाल्याने त्याच्या या अवस्थेकडे शेजाऱ्यांनी सुद्धा दुर्लक्ष केले. दुपारी चार वाजता दरवाजा तोडल्यावर पत्नी गळफास घेतलेल्या आणि मुलीला अंथरुणावर निपचीत पडलेल्या अवस्थेत पाहिले.