चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या, संतोष भवनच्या वालईपाडा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 20:35 IST2023-03-13T20:33:16+5:302023-03-13T20:35:40+5:30
पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या, संतोष भवनच्या वालईपाडा येथील घटना
मंगेश कराळे -
नालासोपारा - चारित्र्याच्या संशयावरुन संतोष भवनच्या वालईपाडा येथे पतीने पत्नीची टॉवेलच्या साहायाने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पेल्हार पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली, यानंतर पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
वालईपाडा येथील नरेंद्र नगरच्या साई सिद्धी चाळीत राहणाऱ्या अनिता विश्वकर्मा (२५) हिची हत्या आरोपी पती प्रभूनाथ विश्वकर्मा (२६) याने केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पतीने चारित्र्याच्या संशयावरून रविवारी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पत्नी झोपेत असताना टॉवेलच्या साहायाने गळा आवळून हत्या केली. आरोपीने दोन्ही लहान मुलांना शेजारील चाळीत रहाणाऱ्या बहिणीच्या घरी सोडले व रात्रभर विचार करत तो मृतदेहाजवळ झोपला. सोमवारी सकाळी सात वाजता उठून आरोपी कामावर गेला. पण त्याचे मन लागत नसल्याने पेल्हार पोलीस ठाण्यात दुपारी जाऊन घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली.
१) सदर घटनेप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. पण त्याने ही हत्या नेमकी का व कोणत्या कारणांमुळे केली याचा तपास करत आहे.
- वसंत लब्दे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)