पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:06 IST2025-07-12T17:05:52+5:302025-07-12T17:06:14+5:30
Crime Madhya Pradesh : सपना जाधव असे पीडित महिलेचे नाव असून, ती गेल्या सहा महिन्यांपासून पती अमित जाधवपासून वेगळी राहत होती.

पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात एका पतीने आपल्या पत्नीवर तलवारीने सपासप वार केले. या हल्ल्यातील शेवटचा वार इतका भयानक होता की, तलवार पत्नीच्या मांडीत इतकी खोलवर रुतली आणि तिथेच अडकून राहिली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची टीम शस्त्रक्रिया करून ती तलवार काढण्याचा प्रयत्न करत आहे.
चारित्र्याच्या संशयातून हल्ला
सपना जाधव असे पीडित महिलेचे नाव असून, ती गेल्या सहा महिन्यांपासून पती अमित जाधवपासून वेगळी राहत होती. सपना लोकांच्या घरी स्वयंपाकाचे काम करते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अमितला सपनाच्या चारित्र्यावर संशय होता आणि याच कारणामुळे दोघांमध्ये फोनवरून नेहमी वाद होत असत. शुक्रवारी संध्याकाळीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते.
तलवारीने केले सपासप वार
शनिवारी सकाळी सपना हेलीपॅड कॉलनीमध्ये कामावर जात असताना, वाटेत अमितने तिचा रस्ता अडवला. सुरुवातीला दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून काही बाचाबाची झाली आणि नंतर अमितने रागाच्या भरात आपल्याजवळ असलेल्या तलवारीने पत्नीवर हल्ला चढवला. अनेक वार केल्यानंतर एक वार इतका जोरदार होता की, तलवार थेट तिच्या डाव्या मांडीत घुसली आणि तिथेच अडकली. आरोपीला ती तलवार काढता आली नाही आणि त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला तात्काळ पकडले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी सपनाला तातडीने जयारोग्य रुग्णालय समूहाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. डॉक्टरांची टीम तिच्या मांडीत अडकलेली तलवार काढण्यासाठी शस्त्रक्रिया करत आहे.
आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल
झांसी रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी पती अमित जाधव याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असून, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.