पत्नीला पळवून नेल्यामुळे पतीने काढला प्रियकाराचा काटा; 'त्या' खुनाचा अखेर उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 17:43 IST2020-10-11T17:42:53+5:302020-10-11T17:43:08+5:30
गंगापूर धरणालगत आढळला होता मृतदेह

पत्नीला पळवून नेल्यामुळे पतीने काढला प्रियकाराचा काटा; 'त्या' खुनाचा अखेर उलगडा
नाशिक: आभाळवाडी परिसरातील एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करुन दोन महिन्यांपूर्वी विवाहितेला पळवून घेऊन गेल्याचा राग मनात धरत विवाहितेच्या पतीने प्रियकराचा निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दोन दिवसांपूर्वी गंगापूर धरणाच्या परिसरात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवून तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. याबाबत अधिक माहिती अशी, हरसूल येथे राहणारा नितीन टबाले याचा सावरगाव शिवारात गंगापूर धरणाच्या परिसरात पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचा पंचनामा केला असता, त्याची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचे समोर आले.
तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना तालुका पोलीस ठाण्याचे शिपाई विक्रम कडाळे यांना मयत नितीन याचे आभाळवाडीतील एक विवाहित स्त्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचा धागा मिळाला. त्यावरुन पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरविली असता नितीन हा मागील दोन महिन्यांपासून त्या विवाहितेसोबत राहत होता आणि तिच्या पतीने त्याचा खून केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या महितीच्याआधारे संशयित अशोक मोरे (23, रा. आभाळवाडी, उजवा कॅनॉल, महादेवपूर शिवार) यास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता अशोक याने गुन्हयाची कबुली देत घडलेली हकीगत सांगितली. यानुसार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करत त्यास खुनाच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या. पुढील तपास तालुका पोलिस करत आहेत.