उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात एका पत्नीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीची हत्या केली आहे. या घटनेनंतर बॉयफ्रेंड घटनास्थळावरून फरार झाला असून, पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. बॉयफ्रेंडला पकडण्यासाठी पोलिसांची चार पथकं तैनात करण्यात आली आहेत.
लंभुआ कोतवाली क्षेत्रातील मदनपूर पनियार गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. याच गावात राहणाऱ्या अमित सिंहचं लग्न काही वर्षांपूर्वी शिल्पी सिंहशी झालं होतं. अमित सिंह ट्रक चालवण्याचं काम करायचा. अमितचा मित्र दीपक हा देखील ट्रक चालवायचा, त्यामुळे त्याचं अमितच्या घरी नेहमी येणं-जाणं असायचं. या दरम्यान दीपक आणि शिल्पी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
जेव्हा या प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना मिळाली, तेव्हा दीपक आणि शिल्पीची समजूत काढून हे प्रकरण शांत करण्यात आलं होतं. मात्र कालही दीपक अमितच्या घरी आला होता. रात्री अमित झोपलेला असताना दीपकने शिल्पीला उठवलं आणि दोघांनी मिळून अमितवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अमितचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती आसपासच्या लोकांना मिळताच परिसरात खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आलं. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अमितचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तपासासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे. या गुन्ह्यानंतर दीपक फरार झाला असून पोलिसांनी चौकशीनंतर शिल्पीला अटक केली आहे.