पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 09:11 IST2025-12-14T09:11:37+5:302025-12-14T09:11:57+5:30
तीन वर्षांपूर्वी पत्नीचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पतीचा खरा चेहरा पोलिसांनी केलेल्या तपासामुळे उघड झाला.

पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
बदलापूर : तीन वर्षांपूर्वी पत्नीचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पतीचा खरा चेहरा पोलिसांनी केलेल्या तपासामुळे उघड झाला. पतीनेच मित्रांच्या मदतीने सर्पदंश करवून पत्नीची हत्या केल्याचे तपासात समोर आले व बदलापूर पोलिसांनी पतीसह तिघांच्या मुसक्या आवळल्या.
रूपेश आंबेरकर असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याची पत्नी नीरजा यांचा बदलापूर पूर्वेतील एका इमारतीत १० जुलै २०२२ रोजी मृत्यू झाला होता.
अशी केली पत्नीची हत्या
१. रूपेश आंबेरकरने नीरजा यांच्या पायाला मसाज करण्याच्या बहाण्याने आपला मित्र कुणाल चौधरी, सर्पमित्र चेतन दुधाणे आणि हृषीकेश चाळके यांना घरी बोलावले. मसाज करण्याच्या बहाण्याने चेतन दुधाणे याने बरणीतून नाग काढला आणि तो हृषीकेशच्या हातात दिला.
२. हृषीकेशने त्या नागाद्वारे नीरजाच्या पायावर तीनवेळा सर्पदंश करवून तिला संपवले. त्यानंतर रूपेशने ब्रेन हॅमरेजचा बनाव करून निरजा यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासवले. मात्र, तीन वर्षांनी एका गुन्ह्यात हृषीकेश चाळके पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून कबुलीजबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर गुन्हा नोंदवून नीरजाचा पती रूपेश आंबेरकर, कुणाल चौधरी आणि चेतन दुधाणे यांना अटक केली.