घटस्फोट, दुसरं लग्न अन् बदला..! परदेशातून येत पहिल्या पतीने सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:29 IST2026-02-19T09:55:01+5:302026-02-19T11:29:39+5:30
कौटुंबिक वादातून राग डोक्यात घालत सुनीताला तिच्या पहिल्या नवऱ्याने मारले असा पोलिसांना अंदाज आहे.

घटस्फोट, दुसरं लग्न अन् बदला..! परदेशातून येत पहिल्या पतीने सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला संपवलं
हैदराबाद - तेलंगणाच्या हैदराबाद येथे वैनस्थलीपुरम परिसरात एका ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची कथितपणे तिच्या एक्स नवऱ्याने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ग्रीन सिटी कॉलनी येथील एका अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर ही घटना घडली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
माहितीनुसार, या मृत महिलेचे नाव सुनीता आहे. ती वैनस्थलीपुरम इथल्या एका फ्लॅटमध्ये राहत होती. प्राथमिक तपासात या घटनेतील आरोपी महेश जो स्वत:ही सॉफ्टवेअर व्यवसायाशी निगडित आहे. तो परदेशात नोकरी करत आहे. दुपारच्या सुमारास महेश सुनीताच्या फ्लॅटवर पोहचला होता. यावेळी महेशने सुनीतावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात चाकू आणि विळ्याचा वापर करण्यात आला होता. महेशने सुनीतावर बरेच वार केले त्याशिवाय डोक्यावरही हल्ला केला. गंभीर दुखापतीमुळे सुनीताचा जागीच मृत्यू झाला.
२०२४ साली सुनीता आणि महेश यांच्यात घटस्फोट झाला होता. सुनीताने अलीकडेच दुसरे लग्न केले आणि तिच्याकडून करण्यात आलेल्या घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यामुळे आरोपी महेश याच्या मनात राग होता. तपास अधिकारी या घटनेची आणखी माहिती घेत आहेत. कौटुंबिक वादातून राग डोक्यात घालत सुनीताला तिच्या पहिल्या नवऱ्याने मारले असा पोलिसांना अंदाज आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आसपासच्या लोकांचीही चौकशी केली. त्यानंतर काही काळातच पोलिसांनी त्याच परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस सध्या या आरोपीची चौकशी करत असून अधिकृतपणे कुठलाही खुलासा नाही.
मध्यस्थी करणाऱ्यांनाही दिली धमकी
आरोपी महेश पुरी पूर्ण तयारीसह सुनीताच्या घरी आला होता. त्याने सोबत २ चाकू आणि एक पेट्रोल कॅनही आणला होता. घटनेच्या वेळी जेव्हा आसपासच्या लोकांनी जेव्हा या दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकला तेव्हा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने मध्यस्थी करणाऱ्या लोकांना तुमच्यावर पेट्रोल टाकून घराला आग लावून टाकण्याची धमकी दिली. जर कुणी दोघांच्या वादात मध्ये पडले असते तर आरोपीने घराला आग लावली असती. त्यामुळे काहींनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती देत घटनास्थळी बोलवले. पण तोवर आरोपीने सुनीतावर गंभीर हल्ला केला होता.