खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:58 IST2025-12-16T15:57:17+5:302025-12-16T15:58:11+5:30
कर्नाटकची राजधानी बंगळूरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

फोटो - ndtv.in
कर्नाटकची राजधानी बंगळूरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टीव्ही सीरियल आणि फिल्म अभिनेत्री चैत्रा आर हिचं तिच्या पतीने अपहरण केलं. मुलीची कस्टडी मिळवण्याच्या उद्देशाने हे अपहरण करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात अभिनेत्रीचा पती हर्षवर्धन आणि त्याचा सहकारी कौशिक हे मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं. अभिनेत्रीची बहीण लीला आर हिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चैत्रा आणि हर्षवर्धनचं २०२३ मध्ये दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 'लव्ह मॅरेज' झालं होतं.
कपलला मोनिषा नावाची एक वर्षाची मुलगी आहे. गेल्या ७-८ महिन्यांपासून भांडणामुळे दोघे वेगळे राहत होते. हसन जिल्ह्यातील होसकोप्पलुचा रहिवासी असलेला हर्षवर्धन 'वर्धन एंटरप्रायझेस'चा मालक असून तो फिल्म प्रोड्यूसर देखील आहे. चैत्रा आपल्या मुलीसोबत बंगळूरूच्या मागडी रोडवरील भाड्याच्या घरात राहत होती आणि सीरियल्समध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत होती.
७ डिसेंबरच्या सकाळी चैत्राने कुटुंबीयांना सांगितलं की, ती म्हैसूर येथे शूटिंगसाठी जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग होता. हर्षवर्धनने आपला सहकारी कौशिक याला २०,००० रुपये दिले आणि सकाळी सुमारे ८ वाजता चैत्राला म्हैसूर रोड मेट्रो स्टेशनवर बोलावलं. तिथून तिला जबरदस्तीने कारमध्ये NICE रोड आणि बिडादी मार्गे नेण्यात आलं.
सकाळी सुमारे १०:३० वाजता चैत्राने मित्र गिरीशला फोन करून अपहरणाची माहिती दिली, ज्याने त्वरित कुटुंबाला सांगितलं. संध्याकाळी हर्षवर्धनने चैत्राची आई सिद्धम्मा यांना फोन करून अपहरणाची कबुली दिली आणि धमकी दिली. नंतर त्याने एका अन्य नातेवाईकाला फोन करून अरसीकेरे येथे मुलीला आणण्यास सांगितलं आणि चैत्राला सुरक्षित सोडण्याचं आश्वासन दिलं. चैत्राचा फोन बंद असल्यामुळे तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कुटुंबातील सदस्य तिप्तूर आणि बंगळूरू येथून एकत्र जमले आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. बहिणीच्या तक्रारीवरून ब्याटरायनपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.