नागपुरात पतीने घेतला गळफास, त्याआधी बंगळुरूत पत्नीने संपवलं जीवन; नेमकं घडलं तरी काय?
By दयानंद पाईकराव | Updated: December 27, 2025 18:57 IST2025-12-27T18:55:54+5:302025-12-27T18:57:44+5:30
वर्धा रोडवरील हॉटेल रॉयल व्हिलाच्या खोली क्रमांक १०३ मधील घटना

नागपुरात पतीने घेतला गळफास, त्याआधी बंगळुरूत पत्नीने संपवलं जीवन; नेमकं घडलं तरी काय?
दयानंद पाईकराव, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: घरात नेहमी होत असलेल्या भांडणातून पत्नीने बंगळुरूत गळफास घेतला. तिच्या माहेरच्या मंडळीने पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून पतीला धमकी दिली. त्यामुळे मोठा भाऊ व आईसोबत नागपुरात आलेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वर्धा रोडवरील हॉटेल रॉयल व्हिलाच्या खोली क्रमांक १०३ मध्ये शनिवारी रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सुरज शिवन्ना (३०, रा. बीईएल ले आऊट, विद्यारन्यपुरा बंगळुरु कर्नाटक) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तो बंगळूरमध्ये हॉटेल चालवितो. दीड महिन्यांपूर्वी त्याचे गानवी उर्फ राशी या तरुणीसोबत लग्न झाले होेते. परंतु लग्नापासून त्यांच्यात नेहमीच वाद होत असत. याच वादातून गानवी उर्फ राशीने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर २२ डिसेंबरला गानवीच्या माहेरची मंडळी सूरजच्या घरी आले. त्यांनी सूरजला धमकी दिली. त्यामुळे सुरज घाबरला होता. तो आपली आई जयंती शिवन्ना (६०) व मोठा भाऊ संजय शिवन्ना (३६) या दोघांना घेऊन हैद्राबादला व तेथून नागपुरात आला. तिघांनी २६ डिसेंबरला रात्री ९.३० वाजता वर्धा रोडवरील हॉटेल रॉयल व्हिलातील १०२ व १०३ या दोन खोल्या बुक केल्या.
खोली क्रमांक १०३ मध्ये आतील खोलीत सूरज तर बाहेरील खोलीत त्याची आई शिवन्ना आराम करत होती. भाऊ संजय खोली क्रमांक १०३ मध्ये होता. रात्री १२.१५ वाजता सुरजची आई जयंती या संजयच्या खोलीत आल्या. त्यांनी सूरजने पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतल्याचे संजयला सांगितले. त्यानंतर संजय खोलीत गेले असता त्यांना आपला भाऊ सुरज पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्याच्या आईनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय यांनी आईला रोखले. सुरजच्या आत्महत्येबाबत हॉटेल व्यवस्थापनाला माहिती देण्यात आली. लगेच सोनेगाव पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स. हॉस्पीटलला पाठविला. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.