पती सापडला प्रेयसीसोबत; जळगावात पत्नीने दोघांना चोपले

By विलास.बारी | Updated: October 9, 2022 23:27 IST2022-10-09T23:27:57+5:302022-10-09T23:27:57+5:30

पतीने दिली जीव देण्याची धमकी, पोलिसात नोंद

Husband Found With Beloved; In Jalgaon, the wife slapped both of them | पती सापडला प्रेयसीसोबत; जळगावात पत्नीने दोघांना चोपले

पती सापडला प्रेयसीसोबत; जळगावात पत्नीने दोघांना चोपले

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: काॅलेजच्या कामाच्या नावाने घरून गेलेल्या पतीला पत्नीने प्रेयसीसोबत पकडले. जागेवरच दोघांना चोप देत पोलीस ठाण्यात हजर केल्याची घटना रविवारी सकाळी अकरा वाजता घडली. पतीने दिली जीव देण्याची धमकी दिल्यानंतर या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण शिरसोली रस्त्यावरील एका महाविद्यालयात नोकरीला आहे. रविवारी सुट्टी असतानाही तो महाविद्यालयात जायचे असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. पती महाविद्यालय परिसरात रेस्टॉरंटमध्ये प्रेयसीसोबत असल्याची माहिती मिळताच पत्नीने तिच्या भावाला सोबत घेत रेस्टॉरंट गाठले. तेथे तो प्रेयसीसोबत नाश्ता करत होता. हे पाहून पत्नीने दोघांच्या कानशिलात लगावली. भर रस्त्यावर मोठी गर्दी झाली. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले.

या पथकाने सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. तिथे गेल्यावर पतीच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड तिने केला. ठाणे अंमलदार रामकृष्ण पाटील यांनी पती- पत्नी आणि ती असे तिघांचे म्हणणे ऐकून घेत प्रेयसीच्या आई- वडिलांनाही पोलीस ठाण्यात प्राचारण केले. प्रेयसीला तिच्या आई- वडिलांच्या तर प्रियकराला मेहुण्याच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेच्या संदर्भात पत्नीने पती व प्रेयसीविरुद्ध तक्रार दिली असून त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. तू माझ्यावर संशय घेऊ नको, नाही तर मी माझ्या हाताच्या नसा कापून घेईल किंवा रस्त्यावर वाहनांच्या समोर उभा राहून जीव देईन, अशी धमकीही पतीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, यातील प्रियकर तरुण हा पोलीस अमलदाराचा मुलगा आहे. या गुन्ह्याचा तपास समाधान टहाकळे करीत आहेत.

Web Title: Husband Found With Beloved; In Jalgaon, the wife slapped both of them