खळबळजनक! ८ दिवस, ८ पानी पत्र अन् ९ व्या दिवशी...; पत्नी करायची छळ, पतीने संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:32 IST2025-03-11T16:31:08+5:302025-03-11T16:32:27+5:30

अतुल सुभाष सारखीच धक्कादायक घटना समोर आली आहे.

husband end life writing 8 page suicide note he was harassed by his wife | खळबळजनक! ८ दिवस, ८ पानी पत्र अन् ९ व्या दिवशी...; पत्नी करायची छळ, पतीने संपवलं आयुष्य

खळबळजनक! ८ दिवस, ८ पानी पत्र अन् ९ व्या दिवशी...; पत्नी करायची छळ, पतीने संपवलं आयुष्य

बिहारमधील भागलपूरमध्ये अतुल सुभाष सारखीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका किराणा दुकानदाराने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. कमी उत्पन्नामुळे त्याची पत्नी त्याचा छळ करायची. त्याने अनेक दिवस त्याच्या डायरीत सुसाईड नोट्स लिहिल्या, त्यानंतर एका रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

८ पानांची सुसाईड नोट लिहिली. १ मार्चपासून सुसाईड नोट लिहिण्यास सुरुवात केली आणि ९ मार्चपर्यंत तो सुसाईड नोट लिहित होता. त्याने कागदावर आपलं सर्व दुःख व्यक्त केलं. ८ दिवस सुसाईड नोट लिहिल्यानंतर, ९ व्या दिवशी ९ मार्चच्या रात्री त्याने घरामध्ये गळफास घेतला. सुसाईड नोटमध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नी, सासू, मेहुणा आणि मेहुणीला जबाबदार धरल आहे.

आठ पानांची सुसाईड नोट

दीपक असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो बबरगंज पोलीस स्टेशन परिसरातील मोईद्दीनगरमध्ये किराणा दुकान चालवत होता. त्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे गोळा केले. घटनास्थळावरून पोलिसांना एक डायरी सापडली, ज्यामध्ये आठ पानांची सुसाईड नोट लिहिलेली होती. चार वर्षांपूर्वी किराणा दुकानदार दीपकचं झारखंडमधील साहिबगंज येथील राखी रॉयशी लग्न झालं होतं.

सासू आणि पत्नीने केली बेदम मारहाण 

गेल्या एक वर्षापासून दीपकची पत्नी त्याला त्रास देत होती. दीपकच्या कमी उत्पन्नामुळे त्याची पत्नी त्याला सोडून तिच्या माहेरी गेली. दीपक तिला परत आणण्यासाठी तिच्या आईवडिलांच्या घरी गेला तेव्हा त्याचा मेहुणा, सासू आणि पत्नीने त्याला बेदम मारहाण केली. दीपक दारू पीत नसतानाही पत्नीने तो दारू पित असल्याचं म्हटलं. 

दीपकची सासू करायची छळ

दीपकची सासू वंदना रॉय त्याचा छळ करत असे. ती त्याला सांगायची की तो कमवत नाही.त्यामुळे तुला बायकोला सोबत ठेवण्याचा अधिकार नाही. दीपकने त्याच्या आईच्या मृत्यूसाठी त्याची पत्नी आणि सासूलाही जबाबदार धरलं आहे. दीपकच्या सुसाईड नोटवरून असं दिसतं की, तो गेल्या एक वर्षापासून पूर्णपणे नैराश्यात होता. दीपकने संपूर्ण सुसाईड नोट इंग्रजीत लिहिली होती.

२ महिन्यांपासून आत्महत्येचं प्लॅनिंग

सुसाईड नोटमध्ये आधी ३१ जानेवारी ही तारीख लिहिली होती पण नंतर ती खोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि १ मार्च ही तारीख बदलण्यात आली. अशा परिस्थितीत, दीपकने ३१ जानेवारी रोजी सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो दररोज आत्महत्या करण्याचा विचार करत होता. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 

Web Title: husband end life writing 8 page suicide note he was harassed by his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.