पतीचे तुकडे करून ड्रममध्ये भरले; मीठ आणि फिनाईल टाकून मृतदेह विरघळवण्याचा पत्नीचा क्रूर कट! पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:01 IST2026-02-24T11:59:44+5:302026-02-24T12:01:20+5:30
प्रेयसीच्या पतीला संपवून त्याचे तुकडे ड्रममध्ये भरून ते विरघळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

पतीचे तुकडे करून ड्रममध्ये भरले; मीठ आणि फिनाईल टाकून मृतदेह विरघळवण्याचा पत्नीचा क्रूर कट! पण...
बिहारमधील मुजफ्फरपूरच्या बालूघाट मोहल्ल्यात ४ वर्षांपूर्वी घडलेल्या त्या 'ड्रम मर्डर केस'ने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. प्रेयसीच्या पतीला संपवून त्याचे तुकडे ड्रममध्ये भरून ते विरघळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१६च्या न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी सुभाष कुमारला जन्मठेपेची शिक्षा आणि ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अनैतिक संबंधांतून संसाराची राखरांगोळी!
ही रक्ताळलेली कथा आहे राकेश सहनी आणि त्याची पत्नी राधा देवी यांची. राकेश हा बालूघाट भागात भाड्याच्या खोलीत राहत होता. मात्र, राधाचे सुभाष कुमार नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. राकेश या संबंधांना कडाडून विरोध करायचा, जो राधा आणि सुभाषच्या डोळ्यात खुपत होता. अखेर या काट्याला कायमचं दूर करण्यासाठी त्यांनी कट रचला. १८ सप्टेंबर २०२१ रोजी राधाने गोड बोलून राकेशला दिल्लीहून मुजफ्फरपूरला बोलावून घेतले आणि त्याच रात्री त्याचा गळा घोटला.
पुरावा नष्ट करण्यासाठी सैतानी डोकं!
हत्येनंतर जे घडलं ते कोणत्याही हॉरर चित्रपटाला लाजवेल असं होतं. हत्येचा पुरावा कोणालाही मिळू नये यासाठी आरोपींनी राकेशच्या मृतदेहाचे लहान-लहान तुकडे केले. हे तुकडे एका मोठ्या निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये भरले. मृतदेह लवकर कुजावा आणि हाडे विरघळावीत यासाठी त्यांनी त्या ड्रममध्ये मोठ्या प्रमाणात मीठ, ब्लीचिंग पावडर आणि फिनाईल ओतले. कोणाला संशय येऊ नये म्हणून घराला बाहेरून कुलूप लावून आरोपी पसार झाले.
एका स्फोटाने गुपित आलं बाहेर!
१८ सप्टेंबरच्या रात्रीच त्या बंद खोलीतून स्फोटासारखा मोठा आवाज आला आणि अचानक आग लागली. स्थानिक रहिवासी आणि अग्निशमन दलाचे जवान जेव्हा आग विझवायला पोहोचले, तेव्हा त्यांना तिथून भयानक दुर्गंधी येऊ लागली. दुसऱ्या दिवशी १९ सप्टेंबरला सकाळी पोलिसांनी जेव्हा तो निळा ड्रम उघडला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर शिरशिरी आली. ड्रममध्ये मानवी शरीराचे तुकडे रक्तामांसाच्या चिखलात पडलेले होते.
प्रियकर गजाआड, पण पत्नी अजूनही बेपत्ता!
राकेशचा भाऊ दिनेश सहनी याने याप्रकरणी राधा, तिची बहीण आणि सुभाष विरोधात गुन्हा दाखल केला. २२ सप्टेंबर २०२१ रोजी सुभाषला रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली, जेव्हा तो राधासोबत पळून जाण्याच्या तयारीत होता. सरकारी वकील अरविंद कुमार यांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले, ज्या आधारे न्यायालयाने सुभाषला दोषी ठरवलं. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेली पत्नी राधा देवी अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.