पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 17:15 IST2025-09-15T17:14:03+5:302025-09-15T17:15:03+5:30
गौरव महाजन त्यांची पत्नी रवीना आणि आईसोबत सचखंड एक्सप्रेसने लुधियानाहून भुसावळकडे प्रवास करत होते. इटारसी स्टेशनवर गौरव यांना जाग आली असता, रवीना तिच्या सीटवर नव्हती.

AI Generated Image
इटारसी रेल्वे स्टेशनवरून अचानक बेपत्ता झालेल्या एका महिलेचा शोध घेण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. लुधियानाहून पती आणि सासू सोबत परतत असताना, ही महिला इटारसी स्टेशनवर गायब झाली होती. आता ती गुजरातमध्ये सापडली असून, तिने स्वतःच १२ लाखांची खंडणी मिळवण्यासाठी अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. ही महिला महाराष्ट्राची रहिवासी असून, कुटुंबीयांनी तिला सुखरूप पाहून सुटकेचा निःश्वास टाकला.
नेमकी घटना काय?
९ सप्टेंबर रोजी गौरव महाजन त्यांची पत्नी रवीना आणि आईसोबत सचखंड एक्सप्रेसने लुधियानाहून भुसावळकडे प्रवास करत होते. इटारसी स्टेशनवर गौरव यांना जाग आली असता, रवीना तिच्या सीटवर नव्हती. त्यांनी तातडीने शोध सुरू केला, पण ती सापडली नाही. त्यानंतर, गौरव यांनी जीआरपी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी कसून केला तपास
गौरव यांच्या तक्रारीनंतर, रेल्वे पोलीस अधीक्षक राहुल कुमार लोढा आणि जीआरपीचे टीआय संजय चौकसे यांनी तातडीने एक पथक तयार केले. तपास पथकाने भोपाळ, उज्जैन आणि इटारसी स्टेशनवरील सुमारे ७५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यातून असे दिसून आले की, रवीना इटारसी स्टेशनवर उतरली होती आणि त्यानंतर ती भोपाळ-उज्जैन मार्गे गुजरातला पोहोचली.
खंडणीसाठी दिराला मेसेज
या घटनेनंतर १२ सप्टेंबर रोजी रवीनाने तिचा दीर सौरभ महाजन यांना एक मेसेज पाठवला. या मेसेजसोबत स्वतःचा फोटोही पाठवला होता, ज्यात ती कोणाच्या तरी ताब्यात असल्याचे दिसत होते. या फोटोसोबत १२ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. हा मेसेज रवीनाच्याच मोबाईलवरून पाठवण्यात आला होता.
पोलिसांनी लावला छडा
या मेसेजमुळे पोलिसांना रवीनाच्या लोकेशनची माहिती मिळाली. १३ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या पथकाने गुजरातच्या छोटा उदयपूर जिल्ह्यातील अमरपूर गावातील एका पोल्ट्री फार्ममधून तिला ताब्यात घेतले. चौकशीत रवीनाने सांगितले की, सासरच्या मंडळींना त्रास देण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी तिने हा कट रचला होता. रेल्वे पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी तिला ताब्यात घेतले असून, लवकरच तिला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार आहे. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, रवीनाला दोन वर्षांचा एक मुलगाही आहे. पोलिसांनी तिच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयात होईल आणि त्यानंतर तिला शिक्षा सुनावली जाईल.