Husband and father-in-law acquitted of defamation suit | विनयभंगाच्या खटल्यातून पती व सासरा निर्दोष मुक्त

विनयभंगाच्या खटल्यातून पती व सासरा निर्दोष मुक्त

मुंबई: सात वर्षांपूर्वी पुण्यात भररस्त्यात आपल्या पती व सासऱ्याने आपला विनयभंग केला व मारहाण करून जखमी केले अशा आरोपावरून एका महिलेने दाखल केलेल्या खटल्यात पुणे सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली
आहे.
पुण्यात राहणाºया डॉ. सारिका रानडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१२ रोजी नोंदविलेल्या फिर्यादीवरून श्रीश सोसायटी, हाजुरी दर्गा रोड, ठाणे (प.) येथे राहणारे त्यांचे दाताचे डॉक्टर असलेले पती डॉ. अक्षय रानडे (४३ वर्षे) व सासरे अरुण रानडे (७२) यांच्यावर हा खटला गुदरण्यात आला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या दोघांना भादंवि कलम ३५४( विनयभंग) व ३२३ (मारहाण करून इजा करणे) या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून अनुक्रमे एक वर्ष व एक महिन्यांचा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध केलेले अपील मंजूर करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरिभाऊ आर. वाघमारे यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

न्यायाधीश वाघमारे यांनी सादर झालेल्या साक्षीपुराव्यांचे बारकाईने विश्लेषण करून असे नमूद केले की, स्वत: फिर्यादीची जबानी व अभियोग पक्षाच्या साक्षीदारांच्या साक्षी यांच्यात विसंगती व तफावत दिसते. या साक्षी वैद्यकीय पुराव्यांशीही जुळत नाहीत फार तर आरोपी व फिर्यादी यांच्यात बाचाबाची व झोंबाझोंबी झाल्याचे घटनाक्रमावरून दिसते. शिवाय पतीने विनयभंग केल्याची फिर्यादीची मुळात तक्रारच नाही. सासºयांच्या ज्या कृतीने तिने विनयभंगाचा आरोप केला आहे ती कृती त्यांनी विनयभंग करण्याच्या हेतूने जाणूनबुजून केली, असे म्हणता येत नाही.

अक्षय व सारिका या डॉक्टर दाम्पत्याचा फेब्रुवारी २००३ मध्ये विवाह झाला. त्यांना सिया नावाची मुलगी असून ती पुण्यात सेंट हेलेना’ज शाळेत शिकते. दाम्पत्यात वैवाहिक कलह सुरु असून पत्नी सासरी राहात नाही. सारिका यांनी पती व सासºयांविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा व कौटुंबिक हिंसाचाराचा खटलाही दाखल केला आहे. सारिकाला पुन्हा सासरी नांदायला पाठवावे यासाठी अक्षय यांनी केलेले प्रकरण कौटुंबिक न्यायालयात सुरु असून त्यात त्यांना आईसोबत राहणाºया मुलीला भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

या खटल्यात सारिका यांचा आरोप असा होता की, १४ सप्टेंबर २०१२ रोजी दुपारी सियाची शाळा सुटली तेव्हा तिला घरी नेण्यासाठी
आपण गेलो होतो. तेव्हा पती व साररेही तेथे आले. पती सियाला बळजबरीने आपल्याबरोबर ओढून नेऊ लागला. त्याला विरोध केल्यावर
पती व सास-याने भररस्त्यात आपला विनयभंग केला व आपल्याला आणि ड्रायव्हरला मारहाण केली. शाळेचे वॉचमन लोंढे व शाळेच्या बसचे ड्रायव्हर देशमुख यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिलेली असूनही अभियोग पक्षाने नि:ष्पक्ष साक्षीदार म्हणून त्यांची साक्ष काढली नाही, असा प्रतिकूल अभिप्राय न्यायालयाने नोंदविला.

Web Title: Husband and father-in-law acquitted of defamation suit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.