अर्णब गोस्वामी यांना लष्कराची संवेदनशील माहिती मिळतेच कशी?, अनिल देशमुख यांनी उपस्थित केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 17:47 IST2021-01-18T17:46:38+5:302021-01-18T17:47:15+5:30
Anil Deshmukh on Arnab Goswami : अर्णब- पार्थो दासगुप्ता ‘चॅट’प्रकरणी गंभीर दखल

अर्णब गोस्वामी यांना लष्कराची संवेदनशील माहिती मिळतेच कशी?, अनिल देशमुख यांनी उपस्थित केला प्रश्न
नाशिक : भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे कशी पोहचली? अर्णव यांनी आणि पार्थोदास गुप्तासाेबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत याबाबत तपासी अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांची महत्वाची बैठक मंगळवारी (दि.१८) बोलावली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
सोमवारी अनिल देशमुख हे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी येथील शासकिय विश्रामगृहावर पत्रकारांसोबत दुपारी त्यांनी संवाद साधला. अर्णव गोस्वामी आणि पार्थोदास गुप्ता यांना लष्करी कारवाईबाबतची माहिती तसेच पुलवामा हल्ल्याबाबतची माहिती कशी मिळते? असा प्रश्न देशमुख यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. अर्णव व पार्थोदासच्या संभाषणामधून अत्यंत संवेदनशील बाबी समोर आली आहे. याबाबत राज्य सरकारकडून संपुर्ण माहिती घेतली जात असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. अर्णव यांना संवेदनशील व गोपनीय माहिती मिळालीच कशी? याचा शोध घेतला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती या दोघांच्या संभाषणामधून पुढे आल्याने केंद्र व राज्य सरकारदेखील सतर्क झाले असून त्याबाबत कसून चौकशी व तपास केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर मंगळवारी मुंबईत बैठक बोलविण्यात आली आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
‘सर्जिकल स्ट्राइक’बाबतही होती माहिती
जम्मु काश्मिरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत गोपनीय पध्दतीने केंद्र सरकार व भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून लष्करी कारवाईची (बालाकोट सर्जिकल स्ट्राइक) माहिती थेट रिपब्लिक टीव्ही’चे अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत कशी पोहचली आणि त्यांनी याबाबत ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थाे दासगुप्ता यांच्याशी याबाबत संवाद साधत माहितीची देवाणघेवाण केल्याचेही पुढे आले आहे. एकुणच ‘टीआरपी’ घोटाळ्याच्या तपास आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून या संपुर्ण घोटाळ्याची चौकशी सुरु आहे.