एक घर चार जणांना विकले, पैसे घेऊन बिल्डर फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 01:29 IST2019-06-27T01:29:22+5:302019-06-27T01:29:49+5:30
वांगणी गावातील एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या इमारतीमधील एकच फ्लॅट तीन ते चार जणांना विकून पोबारा केला आहे.

एक घर चार जणांना विकले, पैसे घेऊन बिल्डर फरार
बदलापूर : वांगणी गावातील एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या इमारतीमधील एकच फ्लॅट तीन ते चार जणांना विकून पोबारा केला आहे. त्यात त्याने आपल्या जवळच्या नातेवाइकांचीही फसवणूक केली आहे. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांगणी परिसरात रऊ फ शेख या बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचे बांधकाम केले असून या इमारतीमधील एकच फ्लॅट तीन ते चार जणांना विकला आहे. त्याच्या या कृतीमुळे अनेकांची घरे अडचणीत सापडली आहेत. फ्लॅट विकत घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाने आपल्या फ्लॅटला कुलूप लावल्याने एकाच फ्लॅटच्या दरवाजाला तीन कुलुपे लावल्याचेही दिसत आहे. त्यातील एक ग्राहक म्हणजे नाजिया शेख. शेख यांनी टप्प्याटप्प्याने रऊफ याला पाच लाख दिले. मात्र, फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करत नसल्याने त्यांनी त्याच्याकडे तगादा लावला. तरीही, तो प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी रऊफ याच्याविरोधात तक्रार केली.
पोलिसांनीही या प्रकरणाची माहिती घेतल्यावर त्या बांधकाम व्यावसायिकाने एकच फ्लॅट तीन ते चार जणांना विकल्याचे समोर आले आहे.
सीमा शेख यांनीही फ्लॅट बुक केला. मात्र, त्यांच्या फ्लॅटला तीन कुलूप लागल्याने हा फ्लॅट तीन जणांना विकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली आहे. वांगणीत अनेक बांधकाम प्रकल्प सध्या सुरू आहेत.