Patna Crime News: बिहारची राजधानी गेल्या काही महिन्यांपासून हत्यांच्या घटना आणि गुन्हेगारीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच पाटणामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याच्या तीन-चार घटना घडल्या. आता एक भयंकर घटना समोर आली आहे. एम्स रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका नर्सच्या दोन मुलांना जिवंत जाळून मारण्यात आले. काही गुंड घरात घुसले आणि त्यांनी मुलांना पेटवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाटणामधील जानीपूर पोलीस ठाणे हद्दीत ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे. अंजली आणि अंश अशी गुंडांनी जाळून मारलेल्या मुलांची नावे आहेत.
शोभा देवी आणि ललन कुमार गुप्ता याची दोन्ही मुले अंजली आणि अंश शाळेतून घरी आले होते. ते घरी पोहोचल्यानंतर काही गुंड घरात घुसले आणि त्यांनी मुलांना पेटवून दिले. मुलांचा जळून मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
बेडवर मृतदेह, आईचा दारात आक्रोश
मुलांना जाळून मारल्याचे कळल्यानंतर त्यांची आई शोभा देवी घरी आल्या. मुलांचे मृतदेह पाहून त्यांनी दारातच टाहो फोडला. त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
फुलवारी शरीफ झोन २ चे पोलीस उपायुक्त दीपक कुमार यांनी सांगितले की, "दोन मुलांचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. घटना घडली तेव्हा घरात दोन्ही मुलेच होती."