खळबळजनक ! जळालेल्या अवस्थेत आढळले महिलेचे मुंडके
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 19:37 IST2019-03-26T19:34:11+5:302019-03-26T19:37:16+5:30
घणसोली येथील प्रकार : धड शोधण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरु

खळबळजनक ! जळालेल्या अवस्थेत आढळले महिलेचे मुंडके
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - घणसोली येथील मोकळ्या भूखंडावरील झाडीमध्ये अज्ञात महिलेचे मुंडके आढळून आले आहे. सदर मुंडके जळालेल्या अवस्थेत असून धड अद्याप सापडलेले नाही. त्यानुसार पोलिसांकडून लगतच्या परिसरात धड शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
घणसोली पामबीच मार्गालगतच्या मोकळ्या भूखंडावर हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी झाडीमध्ये अज्ञात महिलेचे मुंडके आढळून आले. घटनेची माहिती मिळताच रबाळे तसेच कोपर खैरणे पोलिसांनी तसेच गुन्हे शाखा पोलिसांनी धाव घेतली आहे. सदर मुंडके महिलेचे असून अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे. यावरून सदर महिलेची गळा चिरून हत्या केल्यानंतर मुंडके त्याठिकाणी टाकल्याचे दिसून येत आहे. मात्र या महिलेचे धड अद्याप सापडले नसून पोलिसांकडून परिसरात शोध घेतला जात आहे.
ज्याठिकाणी हा प्रकार घडला आहे तो भूखंड घणसोली येथील पामबीच मार्गालगत आहे. सकाळ संध्याकाळ या मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शिवाय दुसऱ्या बाजूला घरोंदा वसाहत आहे. यामुळे मारेकरूने रात्रीच्या वेळी मुंडके त्याठिकाणी टाकल्याची दाट शक्यता आहे. हा प्रकार निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तर मयत महिलेची ओळख पटवण्यासाठी परिसरातील बेपत्ता महिलांची माहिती पोलिसांकडून मिळवली जात आहे.