प्रामाणिकपणा! हरवलेले दीड लाख रुपये रिक्षाचालकामुळे मिळाले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 19:54 IST2021-09-01T19:53:46+5:302021-09-01T19:54:54+5:30
Honesty of Rickshaw Driver : सपकाळे यांनी ती बॅग उघडली असता त्यामध्ये बॅग ज्याची होती, त्या जय पोपटलाल गडा यांचे ओळखपत्र, विझिटिंग कार्ड व दीड लाख रुपये रोख आढळली.

प्रामाणिकपणा! हरवलेले दीड लाख रुपये रिक्षाचालकामुळे मिळाले परत
मीरारोड - रिक्षात विसरून गेलेल्या प्रवाश्याची दीड लाख रुपये रोख असलेली बॅग प्रामाणिक रिक्षा चालकामुळे परत मिळाली. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास नवघर नाका येथे रिक्षा चालक वासुदेव सावंत ( रिक्षा क्र. एमएच ४७ जेडी ६८४५ ) यांनी तेथे कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस सुधाकर सपकाळे यांना भेटून रिक्षात एक प्रवासी स्वतःची बॅग विसरून गेल्याचे सांगितले. सावंत यांनी ती बॅग होती तशीच सपकाळे यांच्याकडे दिली.
सपकाळे यांनी ती बॅग उघडली असता त्या मध्ये बॅग ज्याची होती त्या जय पोपटलाल गडा यांचे ओळखपत्र, विझिटिंग कार्ड व दीड लाख रुपये रोख आढळली. व्हिजिटिंग कार्ड वरील मोबाईल क्रमांक वर संपर्क केला असता, सकाळी दहिसर येथून भाईंदरला येण्या करता रिक्षा पकडल्यानंतर दहिसर चेक नाका येथे उतरताना बॅग रिक्षातच विसरल्याचे गडा यांनी सांगितले.
सपकाळे यांनी त्यांना बोलवून बॅग त्यांचीच असल्याची शहानिशा केल्या नंतर ती त्यांना परत केली. हरवलेली बॅग व पैसे परत मिळाल्यामुळे गडा यांनी रिक्षाचालक सावंतसह सपकाळे यांचे आभार मानले. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी रिक्षाचालक सावंत आणि सपकाळे यांचे कौतुक केले.