मुलीला शाळेत सोडून घरी जाणाऱ्या महिलेसह घरमालकाचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 18:01 IST2020-03-10T18:01:29+5:302020-03-10T18:01:37+5:30
आरोपींनी त्यांना मोटारीत जबरदस्तीने बसवून कपडे काढण्याचा प्रयत्न करून केला विनयभंग

मुलीला शाळेत सोडून घरी जाणाऱ्या महिलेसह घरमालकाचे अपहरण
चिंचवड : मुलीला शाळेत सोडून घरी जाणाऱ्या महिलेला मोटारीतून आलेल्या तिघांनी जबरदस्तीने मोटारीत बसवून अपहरण करत तिचा विनयभंग केला. तसेच त्यांच्या घरमालकाचेही अपहरण केले. शुक्रवारी (दि. ६) सुसगाव येथे ही घटना घडली. अमोल बापु पवार (वय २५, रा. इंदापुर), अमोल गणपत पवार (वय ३९, रा. बारामती) यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २५ वर्षीय महिलेने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी फिर्यादी मुलीला शाळेत सोडून घरी जात होत्या. त्यावेळी मोटारीने आलेल्या आरोपींनी त्यांना मोटारीत जबरदस्तीने बसवून अपहरण केले. त्यांची कपडे काढण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. तसेच घरमालकाचे अपहरण करून मोटार बारामती येथे घेऊन गेले. आरोपी अमोलच्या घरी फिर्यादींना सोडले. नंतर घरमालकाला घेऊन आरोपी पसार झाले.