हॅलो! पटकन लेटरबॉक्स उघडा, खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या सचिवांना परदेशातून आला धमकीचा कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 14:57 IST2021-12-24T14:52:58+5:302021-12-24T14:57:44+5:30
Crime News : या संदर्भात काँग्रेस नेत्याच्या स्वीय सचिवाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हॅलो! पटकन लेटरबॉक्स उघडा, खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या सचिवांना परदेशातून आला धमकीचा कॉल
नवी दिल्ली - लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचे स्वीय सचिव यांना परदेशातून धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात काँग्रेस नेत्याच्या स्वीय सचिवाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचे स्वीय सचिव प्रदीप्तो राजपंडित यांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहून म्हटले आहे की, त्यांना काही अनोळखी नंबरवरून कॉल आले आहेत. कॉलर लेटर बॉक्समध्ये काहीतरी ठेवण्याबद्दल बोलत आहे.
हॅलो! तुमचा लेटर बॉक्स उघडा...
काँग्रेस खासदाराच्या स्वीय सचिव यांनी पोलिसांना लिहिले की, 'मला २१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजून ९ मिनिटांनी अमेरिकेतून अनोळखी नंबरवरून फोन आला. दुसऱ्या बाजूची व्यक्ती हिंदीत बोलली आणि मला बंगला क्रमांक 4, साउथ एव्हेन्यू लेनचा लेटर बॉक्स लगेच उघडण्याची विनंती केली. पत्रपेटी उघडली असता पत्रपेटीत काहीही सापडले नाही. त्याचवेळी, यानंतर सायप्रस प्रजासत्ताककडून २ वाजून २८ मिनिटांनी दुसरा कॉल आला (Truecaller नुसार). या व्यक्तीने देखील आपली ओळख उघड केली नाही. परंतु मला लेटर बॉक्स तपासण्याची विनंती केली. यावेळीही बंगल्याच्या लेटर बॉक्समध्ये काहीही आढळून आले नाही.
तसेच त्यांनी लिहिले की, काही वेळाने पुन्हा जर्मनीहून कॉल आला (Truecaller नुसार) आणि USA मधून कॉल आला. फोनवरून पलीकडच्या व्यक्ती वारंवार 'पटकन करा नाहीतर तुम्हाला खूप भय निर्माण होईल' असे सांगून कॉल डिस्कनेक्ट केला. मात्र, यावेळीही लेटर बॉक्समध्ये काहीही आढळून आले नाही. यासोबत त्यांनी लिहिले की, मी माझ्यासोबत उपलब्ध तपशील शेअर करत आहे. कृपया या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती पावले उचलावीत. या बंगल्याच्या परिसरात विशेष सावधानी बाळगा आणि साहेबासह कुटुंबाला पुरेशी सुरक्षा प्रदान करा.
त्याचवेळी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचे खासगी सचिव प्रदीपतो राजपंडित यांच्या पत्रानंतर दिल्ली पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र, सध्या हे प्रकरण चिघळत असल्याचे दिसून येत आहे.