कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 15:58 IST2025-09-26T15:57:58+5:302025-09-26T15:58:48+5:30
नव्या सत्राच्या सुरुवातीलाच चैतन्यानंद कशा प्रकारे मुलींची निवड करायचा आणि धमक्या तसेच आमिष दाखवून त्यांना आपलं शिकार बनवत होता, याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट या संस्थेचा संचालक चैतन्यानंद सरस्वती याच्यावर १७ विद्यार्थिनींनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एका वृत्त वाहिनीसोबत बोलताना संस्थेच्या एका माजी विद्यार्थ्याने चैतन्यानंद उर्फ पार्थ सारथी याच्या काळ्या कृत्यांबद्दल मोठे दावे केले आहेत.
नव्या सत्राच्या सुरुवातीलाच चैतन्यानंद कशा प्रकारे मुलींची निवड करायचा आणि धमक्या तसेच आमिष दाखवून त्यांना आपलं शिकार बनवत होता, याबद्दल माजी विद्यार्थ्याने सविस्तर माहिती दिली.
'अशी' व्हायची निवड
संस्थेच्या वसंत कुंज कॅम्पसमधील माजी विद्यार्थ्याने सांगितले की, नवीन विद्यार्थिनींनी प्रवेश घेतल्याबरोबर चैतन्यानंदसाठी 'निवड' प्रक्रिया सुरू व्हायची. तो स्वत: मुलींना आपल्या खोलीत आणण्यासाठी प्रयत्न करायचा. जसजसे नवीन विद्यार्थी प्रवेश घ्यायचे, तसतशी सिलेक्शन प्रक्रिया सुरू व्हायची. आधी मुलींची निवड केली जाई, त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला जाई आणि चांगल्या सुविधांचे आमिष दाखवले जाई, असे माजी विद्यार्थ्याने सांगितले.
विदेशवारी, आयफोन आणि उत्तम प्लेसमेंटचे आमिष!
माजी विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपी चैतन्यानंद मुलींना मोफत विदेशात फिरवून आणण्याचे, तसेच लॅपटॉप, आयफोन आणि कार सारख्या महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवत असे. यासोबतच चांगले गुण, विदेशात इंटर्नशिप आणि उत्तम प्लेसमेंट यांसारख्या सुविधांचे प्रलोभनही दिले जात होते. ज्या मुली ही ऑफर स्वीकारायच्या, त्यांच्यासाठी संस्थेतील पुढील शिक्षण सोपे केले जायचे.
पण, ज्या मुली नकार द्यायच्या, त्यांच्या अडचणी वाढायच्या. त्यांना खूप त्रास दिला जायचा, कोणाशीही बोलण्याची परवानगी नसायची आणि २४ तास त्यांच्यावर पाळत ठेवली जायची. या त्रासाला कंटाळून अनेक मुलींना कॉलेज सोडण्याची वेळ यायची. इतकेच नाही तर त्यांच्या पालकांनाही त्रास दिला जात होता.
महिला कर्मचाऱ्यांची मदत
माजी विद्यार्थ्याने पुढे सांगितले की, मुलींना निवडण्याचे काम चैतन्यानंद सरस्वती स्वतः करायचा. "तो स्वतः विद्यार्थ्यांशी एक-एक करून बोलायचा आणि मुलींची निवड करायचा. तो मुले आणि मुलींसाठी वेगळे वर्ग घ्यायचा आणि यादरम्यान मुलींची निवड निश्चित करायचा," असे त्याने सांगितले.
या कामासाठी संस्थेतील काही महिला कर्मचाऱ्यांचा वापर केला जात होता. या कर्मचाऱ्यांमार्फत निवडलेल्या मुलींशी संपर्क साधला जाई. 'या महिला कर्मचारी आमिष दाखवून किंवा धमक्या देऊन मुलींना चैतन्यानंदच्या खोलीपर्यंत पोहोचवण्यास मदत करत असत,' असा धक्कादायक खुलासा त्याने केला.
यापैकी काही महिला कर्मचारी संस्थेच्या माजी विद्यार्थिनी असल्याचेही उघड झाले आहे. चैतन्यानंदने पूर्वी त्यांनाही असेच ऑफर देऊन आपले शिकार बनवले होते. आता याच महिला, इतर मुलींना चैतन्यानंदच्या खोलीत जाण्यासाठी तयार करतात, असे माजी विद्यार्थ्याने सांगितले.