खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 17:57 IST2025-09-21T17:48:03+5:302025-09-21T17:57:55+5:30
आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून या नर्सचे अनेक महिने लैंगिक शोषण केले होते आणि जेव्हा तिने लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा तिच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका नर्सवर अॅसिड आणि लोखंडी पान्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, ज्यात तिचा रविवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी या धक्कादायक प्रकरणातील आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून या नर्सचे अनेक महिने लैंगिक शोषण केले होते आणि जेव्हा तिने लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा तिच्यावर हा अमानुष हल्ला करण्यात आला. आरोपीने मृत समजून नर्सला हायवेच्या कडेला फेकून दिले होते.
नेमके काय घडले?
पोलिसांच्या तपासानुसार, मृत तरुणी बदायूं जिल्ह्यातील रहिवासी होती आणि अनंत रूप हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. याच हॉस्पिटलचा संचालक असलेल्या डॉ. श्रीपालसोबत तिची ओळख वाढली. सुरुवातीला त्यांचे संबंध सामान्य होते, पण नंतर डॉक्टरने लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली. एप्रिल महिन्यात जेव्हा तिच्या कुटुंबाला याबद्दल कळले, तेव्हा तिने नोकरी सोडली.
पत्नीप्रमाणे ठेवून केला अमानुष छळ
नोकरी सोडल्यानंतरही आरोपीने तिला संजयनगरमधील एका घरात आपल्या पत्नीसारखे ठेवले. काही दिवस सर्वकाही ठीक होते, पण जेव्हा तरुणीला कळले की आरोपी आधीपासूनच विवाहित आहे, तेव्हा तिने घटस्फोट घेऊन लग्न करण्याचा हट्ट धरला. याच कारणावरून दोघांमध्ये वाद वाढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीपासून कायमची सुटका करून घेण्यासाठी डॉक्टरने एक भयानक कट रचला. १६ सप्टेंबर रोजी त्याने पोटदुखीचे कारण सांगून तिला आपल्या गाडीत बसवले.
बेशुद्ध करून केला जीवघेणा हल्ला
गाडीत बसल्यावर डॉक्टरने तिला ढोकळा आणि बर्गर खायला दिले आणि त्यानंतर तिला नशायुक्त इंजेक्शन दिले. ती बेशुद्ध झाल्यावर त्याने तिच्यावर अॅसिड आणि लोखंडी पानाच्या मदतीने हल्ला केला. गंभीर जखमी आणि बेशुद्ध असलेल्या नर्सला मृत समजून आरोपीने तिला नग्न अवस्थेत महामार्गाच्या कडेला फेकून दिले. त्याचवेळी पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यावर तिने पोलिसांना जबाब दिला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
आरोपी डॉक्टरला अटक
बिथरी चैनपूर पोलिसांनी आरोपी डॉ. श्रीपालला अटक केली आहे. अटक होताना त्याने हृदयविकाराचा झटका आल्याचे नाटक करून रुग्णालयात दाखल होण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याची चलाखी ओळखली. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अॅसिड, कपडे, बूट, पाना आणि ग्लोव्हज जप्त केले आहेत.