घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:32 IST2025-08-07T09:31:52+5:302025-08-07T09:32:34+5:30
एका तरुणाने आपल्या मित्राच्या पत्नीची निर्घृण हत्या केली अन् पुढे जे झालं ते पाहून सगळे हादरले.

घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
बंगळुरूमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणाने आपल्या मित्राच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. मात्र, हत्या आणि आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मृत महिला आणि आरोपीच्या पतीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून मैत्री होती. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.
आरोपीने आतून बंद केला होता दरवाजा
ही घटना बेंगळुरूच्या अनेकल तालुक्यात असलेल्या हेब्बागोडी येथील तिरुपाल्या भागात घडली आहे. मृत महिलेचं नाव मंदिरा मंडल (२७) असून, ती मूळची पश्चिम बंगालची आहे. मंदिराचं लग्न आठ वर्षांपूर्वी बिजोन मंडल यांच्यासोबत झालं होतं आणि त्यांना ६ वर्षांचा मुलगा आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी ती पतीपासून वेगळी झाली आणि तिरुपाल्या येथील एका भाड्याच्या घरात राहू लागली.
मंगळवारी संध्याकाळी मंदिरा नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतली. तिचा मुलगा बाहेर खेळत होता. त्याचवेळी आरोपी सुमन घरात घुसला आणि त्याने दरवाजा आतून बंद केला. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने मुलाने घाबरून आपल्या आजीला ही गोष्ट सांगितली. त्यांनीही खूप वेळ दरवाजा वाजवला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही.
हत्या करून आरोपीने केली आत्महत्या
अखेरीस, महिलेने खिडकीतून आत डोकावून पाहिलं असता तिला धक्काच बसला. तिला सुमन फाशी घेतलेला दिसला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, एका खोलीत मंदिरा मंडल यांचा गळा कापलेला मृतदेह आढळला. तर दुसऱ्या खोलीत सुमनचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत होता. मंदिराचा पती बिजोन मंडल आणि आरोपी सुमन हे दोघे मित्र होते आणि गेल्या दोन वर्षांपासून अंदमानमध्ये एकत्र काम करत होते.
पोलीस तपासात नेमकं काय समोर आलं?
आरोपी सुमन १५ दिवसांपूर्वीच बंगळुरूला परतला होता. तो तिरुपाल्यामध्ये त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता आणि एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होता. मंगळवारी रात्री तो थेट मंदिराच्या घरी आला आणि तिची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने भाजी कापण्याच्या चाकूने तिचा गळा चिरला आणि नंतर स्वतःला फाशी घेतली असावी, अशी शक्यता आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.