Hathras rape case: Police cremated the body of a girl victim of Hathras rape | हाथरस बलात्कार प्रकरण : पीडितेच्या कुटुंबीयांचा विरोध झुगारत UP पोलिसांनी रातोरात उरकले अंत्यसंस्कार

हाथरस बलात्कार प्रकरण : पीडितेच्या कुटुंबीयांचा विरोध झुगारत UP पोलिसांनी रातोरात उरकले अंत्यसंस्कार

ठळक मुद्देहाथरसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाटउत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबीयांचा विरोध झुगारत पीडितेच्या मृतदेहावर रातोरात उरकले अंत्यसंस्कार या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये उसळला प्रचंड जनक्षोभ

लखनौ - हाथरसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे. पीडित तरुणीसोबत आरोपींनी केलेल्या क्रौर्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या दु:खाच्या प्रसंगी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वेदनेवर फुंकर घालण्याची गरज असताना उत्तर प्रदेशपोलिसांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. काल या पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेशपोलिसांनी कुटुंबीयांचा विरोध झुगारत तिच्या मृतदेहावर रातोरात अंत्यसंस्कार उरकले आहेत. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला आहे.

पीडित मुलीवर सकाळी अंत्यसंस्कार करावेत, मुलीचे अंत्यदर्शन घेऊ द्यावे, तिचा मृतदेह घरी नेऊ द्यावा, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. मात्र आधीपासूनच आरोपाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी धुडकावून लावली आणि कडेकोट बंदोबस्तात तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेचा मृतदेह हाथरस येथील तिच्या गावी आणला. त्यावेळी रात्रीचे १२ वाजून ४५ मिनिटे झाली होती. मात्र मृतदेह घेऊन अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचताच स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावर झोपून रस्ता अडवला. स्थानिक आणि पोलीस यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली.

पीडितेचा मृतदेह गावात आणल्यावर एसपी-डीएम पीडितेच्या वडलांना समजावत होते. मात्र आपल्या मुलीवर रीतीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार व्हावेत, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. तिचा मृतदेह घरी न्यावा, अशी कुटुंबीयांची होती. मात्र पोलिसांनी आपला हट्ट सोडला नाही. सुमारे २०० च्या आसपास असलेल्या पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी फेटाळत रात्री २.२० वाजता मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी नेला. त्यानंतर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोलिसांना घेराव घालत कुणालाही चितेजवळ जाऊ दिले नाही.

सुमारे २५ मिनिटांनी पोलिसांनी स्वत:च पीडितेच्या चितेला अग्नी दिला. दरम्यान, पोलिसांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मात्र कुटुंबीयांच्या सहकार्यानेच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, अंत्यसंस्कार होत असताना पीडितेचे कुटुंबीय, स्थानिक ग्रामस्थ आक्रोश करत होते. तर पोलीस मात्र हसत होते, असे वृत्त आज तकने एक फोटो शेअर करत दिले आहे. 

Read in English

English summary :
Police cremated the body of a girl victim of Hathras rape

Web Title: Hathras rape case: Police cremated the body of a girl victim of Hathras rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.