हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:17 IST2025-07-22T12:16:27+5:302025-07-22T12:17:25+5:30
हरियाणाच्या डान्सर सपना शर्माने तिच्या सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि दारू पिऊन नवरा तिला मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

फोटो - nbt
हरियाणाच्या डान्सर सपना शर्माने तिच्या सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि दारू पिऊन नवरा तिला मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी डान्सर सपनाने नारनौल येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सपना शर्माने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये तिने पहिल्यांदाच तक्रार केली होती की तिचा नवरा दारूच्या नशेत तिला मारहाण करतो आणि वारंवार पैशांची मागणी करतो.
दीर आणि सासूवरही मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी तिच्या पतीने तिला खूप मारहाण केली, त्यानंतर ती नारनौल येथील तिच्या माहेरी परतली. पोलीस ठाण्यात दोन्ही बाजुच्या लोकांना बोलावण्यात आलं, ज्यामुळे खूप गोंधळ झाला. सपना शर्माने पोलीस ठाण्यात स्पष्टपणे तिची बाजू मांडली आणि शहरातील अनेक लोकही तिला पाठिंबा देण्यासाठी आले.
सपना आणि तिच्या आईने पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आरोप केला की पोलीस या प्रकरणात निष्पक्षपणे कारवाई करत नाहीत. सपना म्हणाली की, तिच्याकडे सर्व पुरावे आणि व्हिडीओ आहेत, तरीही पोलीस कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. पोलीस स्टेशन इन्चार्जने गेल्या चार महिन्यांत काहीही केलेलं नाही आणि आरोपी पक्षाशी संगनमत करत आहेत असा आरोपही तिने केला.
याच दरम्यान, सपनाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि या सर्व काळात तपासात काय केले गेले असा प्रश्न उपस्थित केला. सपनाने महिला एसएचओवर गंभीर आरोप केले आहेत आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, परंतु सपना शर्माने केलेल्या आरोपांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये होणाऱ्या विलंबावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.