आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:19 IST2025-06-24T13:12:18+5:302025-06-24T13:19:06+5:30
हरियाणा पोलिसांनी चौघांची हत्या करणाऱ्या गँगस्टर रोमिल व्होराला एन्काऊंटरमध्ये ठार केलं.

आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
Romil Vohra Encounter: हरियाणा पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली-हरियाणा सीमेवर दारू व्यावसायिकाची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला चकमकीत ठार मारले. आरोपीविरुद्ध खून आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल होते. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत होते. प्रत्येक वेळी तो पोलिसांना चकमा देऊन पळून जात होता. मात्र मंगळवारी २० वर्षीय या गँगस्टरचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.
हरियाणाच्या स्पेशल टास्क फोर्सने गुरुग्राममधील दिल्ली-हरियाणा सीमेवर झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड रोमिल व्होरा याला ठार मारले. या चकमकीत कुख्यात गुंडाच्या गोळीने दोन पोलीस उपनिरीक्षकही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गँगस्टर रोमिल व्होरा हा कुख्यात काला राणा-नोनी राणा गँगचा शूटर होता. काला राणा आणि नोनी राणा लॉरेन्स टोळीशी संबंधित आहेत. रोमिल सुमारे ८ महिन्यांपूर्वी त्यांच्यात सामील झाला होता.
कुरुक्षेत्रात गँगस्टर व्होराने काही दिवसांपूर्वीच दारू कंत्राटदार शंतनूची हत्या केली होती. याशिवाय, तो यमुनानगरच्या तिहेरी हत्याकांडाच्या प्रकरणातही फरार होता. अंबाला एसटीएफचे पोलीस उपअधीक्षक अमन कुमार यांनी एन्काउंटरची माहिती दिली. रोमिल बराच काळ पोलिसांच्या रडारवर होता आणि अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पोलिसांना तो हवा होता, असं अमन कुमार म्हणाले.
#WATCH | Delhi | Gunshots heard at encounter site where wanted criminal, Romil Vohra was killed in an encounter with Delhi Police Special Cell at Delhi-Haryana border today. Two police personnel were also injured during the encounter
— ANI (@ANI) June 24, 2025
The criminal, who was killed, had murdered a… https://t.co/8RpqAOqed7pic.twitter.com/PNIz0pQpbB
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा एसटीएफला माहिती मिळाली होती की रोमिल व्होरा दिल्ली-हरियाणा सीमेजवळील फरीदाबाद लिंक रोडवर आहे. त्यानंतर एसटीएफने परिसराला घेराव घातला आणि कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान, एसटीएफने रोमिलला घेराव घालण्याचा प्रयत्न करताच त्याने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल एसटीएफनेही जोरदार गोळीबार केला. ज्यामध्ये रोमिल गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या चकमकीत एसटीएफचे २ जवान एसआय प्रवीण आणि एसआय रोहन देखील जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आलं. रोमिल आणि दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना कुठे गोळी लागली याची माहिती समोर आलेली नाही. घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी फरिदाबाद लिंक रोड सुमारे साडेसहा तास बंद ठेवला आहे.
रोमिल फक्त २० वर्षांचा होता पण तो गुन्हेगारीच्या जगतात त्याचे नाव मोठं करु पाहत होता. यमुनानगरमधील कासापूर इथं राहणारा व्होरा हा तिहेरी हत्याकांड प्रकरणात हवा होता. त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्यानंतर त्याने यमुनानगरमध्ये दारू व्यावसायिक शंतनूची हत्या केली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कठोर पावले उचलण्यात आली. मंगळवारी हरिणाया पोलिसांनी रोमिलला घेराव घालून संपवले.