मुंबईत गुन्हेगारांचेही पुनश्च हरिओम; ५,७९७ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:33 AM2020-07-19T01:33:29+5:302020-07-19T06:09:33+5:30

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, शहरात लॉकडाऊनमधील एप्रिल आणि मे महिन्यांत १८ हत्या करण्यात आल्या.

Hariom of criminals in Mumbai; Police records of 5,797 crimes | मुंबईत गुन्हेगारांचेही पुनश्च हरिओम; ५,७९७ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद

मुंबईत गुन्हेगारांचेही पुनश्च हरिओम; ५,७९७ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद

Next

मुंबई : लॉकडाऊनमध्ये एप्रिल, मेदरम्यान रस्त्यावरील गुन्हेगारी कमी झाली होती; कारण सर्वच घरांत कैद होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आणि गुन्हेगारांनीही पुनश्च हरिओमचा राग आळवत आपले काम जोमाने सुरू केले. त्यामुळेच जून महिन्यात रस्त्यावरील गुन्हेगारीसंदर्भातील १,०२० गुन्ह्यांसह एकूण ५,७९७ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद झाली. एप्रिल आणि मे महिन्यांत मिळून जितके गुन्हे नोंदविण्यात आले तेवढे एकट्या जूनमध्ये घडले.

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, शहरात लॉकडाऊनमधील एप्रिल आणि मे महिन्यांत १८ हत्या करण्यात आल्या. यात फक्त एका महिलेचा समावेश आहे. गेल्या याच दोन महिन्यांत २७ हत्या घडल्या होत्या. महिन्यातील ४७ हत्येच्या प्रयत्नांच्या गुह्यांचे प्रमाण घटून २१ वर आले आहे. गंभीर दुखापतीच्या गुह्यांचे प्रमाणही एप्रिल महिन्यात निम्म्याहून खाली आले. शहरात दिवसाला दाखल होणाऱ्या बलात्काराच्या सरासरी तीन गुह्यांचे प्रमाण घटून दर दोन दिवसांत एका गुह्यावर आले.

शहरात दर महिन्याला १५० हून अधिक घरफोडीच्या गुह्यांची नोंद होते. एखाद्या महिन्यात तर हा आकडा २०० पर्यंत पोहोचतो. मात्र लॉकडाऊनच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत घरफोडीचे एकूण ११५ गुन्हेच दाखल झाले. वाहन चोरीचे प्रमाणही कमी झाले. या दोन महिन्यांत अनुक्रमे ८४ आणि १५८ अशा एकूण २४२ गुन्ह्यांची नोंद झाली, तर दरोड्याचा एक आणि खंडणीचे आठ गुन्हे नोंदविले गेले.

मात्र जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून हत्येच्या १३ घटना घडल्या. यापैकी १२ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. या काळात मुंबईतून तब्बल २३५ वाहने चोरीला गेली. यात जीवनावश्यक सामान तसेच भाजी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांच्या वाहनांचाही समावेश आहे. यापैकी अवघ्या ३१ वाहनांचा शोध पोलीस घेऊ शकले. या काळात घरफोडीचे तब्बल १०५ गुन्हे नोंद झाले. विनयभंगाच्या १०३, तर बलात्काराच्या ४६ गुह्यांची नोंद झाली.

मे महिन्यात घडलेल्या २,५३२ गुन्ह्यांपैकी रस्त्यावरील गुन्हेगारीचे ६५४ तर एप्रिलमध्ये दाखल ५,७०३ पैकी रस्त्यावरील गुन्हेगारीच्या ४२५ गुह्यांचा समावेश आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात आता सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यासह या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्याचा ताणही पोलिसांवर आहे.

सांगा दरोडा घालणारच कसा?

लॉकडाऊनमुळे मुंबईकर घरात कैद झाले. मग अशावेळी घरफोडी करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाल्याने चोरांनी घरफोडीकडे पाठ फिरवली. त्यामुळेच एप्रिल व जूनमध्ये एकही घरफोडी झाली नाही तर मे महिन्यात केवळ एकाच घरफोडीची नोंद आहे.

Web Title: Hariom of criminals in Mumbai; Police records of 5,797 crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.