उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात एका आईने तिच्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीशी झालेल्या भांडणात तिने रागाच्या भरात तिच्या दीड वर्षाच्या मुलाला दुमजली घराच्या छतावरून फेकून दिलं. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, हापूरमधील नगर कोतवाली परिसरातील मोहल्ला मजिदपुरा येथे राहणाऱ्या वसीमचं ५ वर्षांपूर्वी बिहारमधील रहिवासी शबानाशी लग्न झालं होतं. लग्नानंतर शबानाला दोन मुलं झाली.
वसीमचा आरोप आहे की, त्याची पत्नी घरात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असे. भांडणाच्या वेळी तिने रागावून दीड वर्षाचा मुलगा अहदला तिच्या मांडीवर उचललं आणि दुमजली घराच्या छतावरून खाली फेकलं. या घटनेनंतर घरात खूप आरडाओरडा झाला.
घटनेनंतर वडील वसीम यांनी शहर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी महिलेला ताब्यात घेतलं. या घटनेबाबत नगर कोतवालीचे निरीक्षक मुनीश प्रताप सिंह म्हणाले की, पोलिसांना माहिती मिळाली होती की, एका महिलेने तिच्या दीड वर्षांच्या मुलाला दुमजली घराच्या छतावरून खाली फेकलं. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.