पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:29 IST2025-08-19T17:28:44+5:302025-08-19T17:29:17+5:30
अलवर येथील घटनेमुळे जितेंद्रची आई मिथिलेश शर्मा यांनी संताप व्यक्त केला.

पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
अलवर - किशनगड परिसरात निळ्या ड्रममध्ये सापडलेल्या हंसराज उर्फ सूरजच्या हत्येचं रहस्य पोलिसांनी सोडवले आहे. या प्रकरणात आरोपी प्रियकर जितेंद्र शर्मा आणि मृत हंसराजची पत्नी लक्ष्मीला अटक करण्यात आली आहे. तपासात जितेंद्र शर्माचे खूप महिन्यांपासून लक्ष्मीसोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर आले. जितेंद्रनेच लक्ष्मीला भाड्याचे घर मिळवून देण्यात मदत केली होती. या प्रकरणाचा आणखी तपास केला असता जितेंद्र शर्माचे अनेक कारनामे समोर आले.
अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध
जितेंद्र शर्माचा इतिहास तपासला असता तो शेजारी राहणाऱ्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या सूनेसोबत ४ वर्ष लिव्ह इनमध्ये राहत होता. त्यानंतर तो लक्ष्मीच्या संपर्कात आला. निवृत्त कर्मचाऱ्याने जितेंद्रवर त्याचे घर उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता. त्याने अनेक महिलांचे आयुष्य बर्बाद केले असं निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने म्हटलं.
पत्नी शशीचा संशयास्पद मृत्यू
जितेंद्रची पत्नी शशी शर्मा हिचा १२ वर्षापूर्वी कूलरमधून करंट लागून मृत्यू झाला होता. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने म्हटलं की, शशीचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या पोटावर खूणा होत्या. तिने चप्पल घातली होती. ज्यामुळे करंट लागल्याने मृत्यू झाल्याची कहाणी संशयास्पद होती. शशी गरीब कुटुंबातून येत होती, त्यामुळे त्यांनी पुढे काहीच तक्रार केली नाही. त्यामुळे हे प्रकरण दाबले गेले.
मुलाने तोंड दाखवायला जागा ठेवली नाही
अलवर येथील घटनेमुळे जितेंद्रची आई मिथिलेश शर्मा यांनी संताप व्यक्त केला. दीड महिन्यापूर्वी जितेंद्रने हंसराज आणि लक्ष्मीला घरी आणले होते. जितेंद्रने केलेल्या कृत्यामुळे आमचं जीवन नर्क बनवले आहे. त्याला १४ वर्षाचा मुलगा आहे. जितेंद्रमुळे आम्हाला समाजातून नको नको ते बोलणे ऐकावे लागत आहे. मुलाने समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही असं आरोपी जितेंद्रच्या आईने म्हटलं. जितेंद्रने शेजारील निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या सूनेसोबतही संबंध ठेवले. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबालाही बदनामी सहन करावी लागत आहे.