सिडकोत बंदूकधाऱ्यांचा धुमाकूळ, नागरिकांना धमकावून लूटले मोबाईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 17:26 IST2023-04-25T17:25:06+5:302023-04-25T17:26:07+5:30
या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सिडकोत बंदूकधाऱ्यांचा धुमाकूळ, नागरिकांना धमकावून लूटले मोबाईल
नरेंद्र दंडगव्हाळ -
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत चुंचाळे पोलिस चौकीच्या हद्दीत सोमवारी (दि.२४) सायंकाळी कारमधून आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सहा ते सात ठिकाणी मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही दिवसांपूर्वीच अंबड औद्योगिक वसाहतीसाठी पोलिस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत स्वतंत्र पोलिस चौकीचे उद्घाटन करण्यात आले होते. अंबड पोलिस ठाण्याच्या अंकित धरतीवर या पोलीस चौकीला स्वतंत्र पोलिस निरीक्षक देखील नेमणूक केला आहे. तसेच ३० पोलीस कर्मचाऱ्यांचीही या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर येथील गुन्हेगारी कमी होईल, अशी अपेक्षा असताना सोमवारी सायंकाळी थेट बंदुकीचा धाक दाखवून सहा ते सात मोबाईल चोरीच्या घटना घडला आहे. औद्योगिक वसाहतीत विविध ठिकाणी काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सहा ते सात जणांचे मोबाईल लांबवले. यामुळे कामगार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर काही उद्योजकांनी पोलिस चौकीवर धाव घेत तात्काळ कारवाईची मागणी केली. दरम्यान या प्रकरणातील संशय त्यांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी दिली