नॉमिनी बनून रचला हत्येचा कट; ४० लाखांच्या विम्यासाठी मोठी बहिणीनेच केली लहान बहिणीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 20:38 IST2025-12-13T20:35:54+5:302025-12-13T20:38:51+5:30
गुजरातमध्ये पैश्याच्या हव्यासापोटी मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नॉमिनी बनून रचला हत्येचा कट; ४० लाखांच्या विम्यासाठी मोठी बहिणीनेच केली लहान बहिणीची हत्या
Gujarat Crime: पैशाच्या हव्यासापोटी रक्ताचे नातेही किती क्रूर होऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण गुजरातच्या वडोदरा शहरात उघडकीस आले आहे. ४० लाख रुपयांच्या जीवन विमा पॉलिसीची रक्कम हडपण्यासाठी मोठ्या बहिणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने लहान बहिणीची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी मोठी बहीण आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून, या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.
वडोदरा येथील ३६ वर्षीय अजीजा दीवान हिच्या हत्येची चौकशी सुरू असताना पोलिसांनी या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला. पोलीस तपासानुसार, मृत अजीजा दीवान हिची मोठी बहीण फिरोजा दीवान हिला पैशाची नितांत गरज होती. तिने ही गरज पूर्ण करण्यासाठी एक भयानक कट रचला. फिरोजा हिने लहान बहीण अजीजा हिचा ४० लाख रुपयांचा जीवन विमा काढला आणि स्वतःला त्या पॉलिसीची नॉमिनी बनवले. या पॉलिसीचा पहिला हप्ता तिने २८ नोव्हेंबर रोजी भरला.
विम्याचे पैसे लवकरात लवकर मिळवण्यासाठी तिने आपला प्रियकर रमीज शेख याला अजीजाची हत्या करण्यासाठी राजी केले. यासाठी तिने शेखला ७ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तीन दिवसांपूर्वी अजीजा दीवानचा मृतदेह अंकोडिया गावात सापडला होता. शवविच्छेदनानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हत्येच्या रात्री अजीजा एका व्यक्तीसोबत दुचाकीवरून जाताना दिसली.
मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास अजीजा गोरवा येथील वडिलांच्या घरातून बाहेर पडली होती. सीसीटीव्ही फुटेजमधून ती ज्या व्यक्तीच्या दुचाकीवर बसली होती, तो व्यक्ती फिरोजाचा प्रियकर रमीज शेख असल्याचे उघड झाले. फिरोजाने अजीजाला सांगितले की, शेख तिला श्रम कार्ड काढून देण्यास मदत करेल, जेणेकरून तिला सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. या बहाण्याने शेख अजीजाला दुचाकीवरून पाद्रा येथे घेऊन गेला आणि नंतर अंकोडिया येथील एका निर्जण स्थळी नेऊन तिचा ओढणीने गळा दाबून खून केला.
बहीण आणि प्रियकर अटकेत
वडोदरा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुशील अग्रवाल यांनी सांगितले की, शेख आणि फिरोजा या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अजीजा पतीसोबतच्या वादामुळे गेल्या सहा महिन्यांपासून वडिलांसोबत राहत होती आणि त्याच घरात तिची बहीण फिरोजा देखील पतीसोबत राहत होती. फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या रमीज शेखने पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली आहे. पैशाच्या लालसेपोटी बहिणीनेच बहिणीच्या जीवाचा सौदा केल्याच्या या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.