हुंड्यासाटी छळ, तरुणीने संपवले आयुष्य; कुटुंबीयांनी नंदेला पोलिसांसमोर केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:00 IST2025-09-29T14:59:44+5:302025-09-29T15:00:22+5:30
पोलिसांच्या गाडीतून बाहेर ओढले, कपडे फाटेपर्यंत बेदम मारले.

हुंड्यासाटी छळ, तरुणीने संपवले आयुष्य; कुटुंबीयांनी नंदेला पोलिसांसमोर केली बेदम मारहाण
Gujarat Crime: गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तेलुगूभाषिक महिलेने हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनी सासरी येऊन मोठा गोंधळ घातला आणि तिच्या नंदेला जबर मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तिच्या नंदेला सुरक्षितपणे पोलिस जिप्सीमध्ये बसवले. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांनी तिला जिप्सीतून बाहेर ओढले आणि परत कपडे फाटेपर्यंत मारले.
ही संपूर्ण घटना सुरतमधील लिंबायत पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बजरंग नगरमध्ये घडली. मोनिका शोबन बाबू पामुला (वय २९) हिने शनिवारी सकाळी तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच तिच्या माहेरचे लोक सासरी पोहचले आणि गोंधळ घातला. तिच्या पालकांनी सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला. यादरम्यान, प्रचंड संतापलेल्या १५ ते २० पुरुष आणि महिला मोनिकाची ननंद ज्योत्स्नाला बेदम मारहाण केली.
अनेकांना घेतले ताब्यात
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि ज्योत्स्नाला सुरक्षितपणे जिप्सीमध्ये बसवले. मात्र, मोनिकाचे कुटुंब इतके संतापले होते की, त्यांनी तिला पोलिस जिप्सीतून बाहेर काढले आणि परत कपडे फाटेपर्यंत जबर मारहाण केली. याप्रकरणी मोनिकाच्या माहेरकडील अनेक लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
मोनिकाच्या पतीला अटक
एसीपी व्हीएम जडेजा यांनी सांगितले की, सुरतमधील लिंबायत पोलिस स्टेशन परिसरातील बजरंग नगर येथे मोनिकाने आत्महत्या केली. तपासात असे दिसून आले की, तिच्या सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करत होते. पोलिसांनी तिच्या पती, सासू आणि नंदेविरोधात गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक केली आहे. मोनिकाचा भाऊ श्रीकांत याच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली.