प्रेमासाठी पतीचा घात! भावनगरमध्ये पत्नी-प्रियकराने मिळून रचला खुनाचा कट, मृतदेह गावाबाहेर फेकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:27 IST2025-10-29T15:23:33+5:302025-10-29T15:27:07+5:30
गुजरातमध्ये पत्नीने प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीची निर्घृणपणे हत्या केली.

प्रेमासाठी पतीचा घात! भावनगरमध्ये पत्नी-प्रियकराने मिळून रचला खुनाचा कट, मृतदेह गावाबाहेर फेकला
Gujarat Crime: गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध आणि क्रूर गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात एका मजुराची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी त्याची पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीने आपल्या प्रियकरासोबत राहता यावे म्हणून पतीला जीवनातून कायमचे दूर करण्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी भावनगरच्या हद्दीबाहेर एका तरुणाचा मृतदेह गंभीर जखमांसह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेह पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास केला असता, तो मृतदेह भावनगरमध्ये राहणाऱ्या कमलेश दुधिया नावाच्या मजुराचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहावरील गंभीर खुणा पाहून पोलिसांनी या घटनेकडे खुनाचा गुन्हा म्हणून तपास सुरू केला.
पोलिसांनी कमलेशच्या लहान भावाकडे चौकशी केली असता, कमलेश आणि त्याची पत्नी ममता यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सतत भांडणे होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपासाची दिशा ममताकडे वळवली. तपासात ममताचे अमन नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या अनैतिक संबंधांमुळेच कमलेश आणि ममता यांच्यात वारंवार वाद होत होते. ममताला अमनसोबत लग्न करायचे होते, परंतु कमलेश जिवंत असेपर्यंत हे शक्य नव्हते. त्यामुळे ममता आणि अमन यांनी मिळून कमलेशला संपवण्याचा कट रचला. त्यांनी अमनचा मित्र अमित यालाही कटात सामील केले.
अखेर तिघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी कमलेशला घराबाहेर बोलावले, त्याची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह गावाबाहेर फेकून दिला, जेणेकरून हा हल्ला अज्ञात व्यक्तींनी केल्याचे भासावे. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्स आणि सखोल चौकशी केल्यानंतर ममता, अमन आणि अमित या तिघांना अटक केली. तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांच्यावर हत्येचा आणि गुन्हेगारी कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.