"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 11:00 IST2025-08-24T10:59:04+5:302025-08-24T11:00:20+5:30

डिसेंबर २०१६ मध्ये दोन्ही बहिणींचं लग्न झालं होतं. दोन्ही मुलींच्या पालकांनी लग्नात त्यांच्या परिस्थितीनुसार हुंड्यात सर्व काही दिलं होतं.

greater noida nikki dowry case husband beat sister told whole story | "पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा

फोटो - ndtv.in

ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यामुळे जिवंत जाळण्यात आलेल्या निक्कीच्या हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. हा खुलासा निक्कीची बहीण कांचनने केला. निक्की आणि कांचन यांचं लग्न एकाच घरात झालं. डिसेंबर २०१६ मध्ये दोन्ही बहिणींचं लग्न झालं होतं. दोन्ही मुलींच्या पालकांनी लग्नात त्यांच्या परिस्थितीनुसार हुंड्यात सर्व काही दिलं होतं. पण तरीही निक्कीची निर्घृणपणे मारहाण करून हत्या करण्यात आली.

कांचनने एनडीटीव्हीशी संवाद साधताना सांगितलं की, "गेल्या ८-९ दिवसांपासून निक्की आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरू होता. निक्कीचा पती विपिनचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते, जे निक्कीला कळाले आणि या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद झाला. २१ तारखेला वाद इतका वाढला की निक्कीला सासरच्यांनी जाळून मारलं. पती आणि सासरच्यांनी मारहाण केली तेव्हा व्हिडीओ बनवला. हे सर्व अचानक घडलं नाही. सर्व काही पूर्वनियोजित पद्धतीने घडलं."

"८ दिवसांपासून हे सर्व चालू होतं, विपिन रात्री घरी येत नव्हता. जर माझ्या बहिणीने त्याला कुठे आहे असं विचारलं तर तो तिला मारहाण करायचा. जेव्हा माझ्या बहिणीने त्रासाला कंटाळून सर्व काही वडिलांना सांगितलं,तेव्हा वडिलांनीही तिलाच समजावून सांगितलं. बहिणीने वडिलांना फोन केला तेव्हा सासू खूप रागावली." 

"११ फेब्रुवारी रोजी निक्कीला बेदम मारहाण करण्यात आली होती. माझी बहीण मेकअप आर्टिस्ट होती. या घटनेनंतर आम्ही आमच्या माहेरी आलो. पुन्हा मार्चमध्ये, जेव्हा आम्ही सासरच्या घरी गेलो तेव्हा तो तिला पुन्हा मारहाण करू लागला. आमच्या पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ, बुलेट, हुंड्यात रोख रक्कम दिली होती, तरीही तो तिला मारहाण करायचा. त्याचे दुसऱ्या मुलींशी प्रेमसंबंध होते, त्यांच्यासाठी पैशांची गरज होती."

"मी व्हिडीओ बनवला कारण लोक म्हणतात की ती नाटक करत आहे. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या बहिणीला जिवंत जाळण्यात आलं. मी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी माझ्या बहिणीला वाचवू शकले नाही. निक्कीच्या पतीचे अनेक मुलींशी संबंध होते. त्याला दिल्लीतील मोलारबंदमध्ये रंगेहाथ पकडण्यात आलं होतं." पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: greater noida nikki dowry case husband beat sister told whole story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.