"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 14:08 IST2025-08-24T14:07:20+5:302025-08-24T14:08:14+5:30
ग्रेटर नोएडामधून हुंड्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

फोटो - आजतक
ग्रेटर नोएडामधून हुंड्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हुंड्यात स्कॉर्पिओ आणि बुलेट देऊनही पती आणि सासरच्यांची हाव संपली नाही. निक्कीला जाळून मारण्यात आलं. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु वाटेतच तिचा मृत्यू झाला. निक्कीच्या कुटुंबीयांनी सासू, सासरे, पती आणि दिरांवर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादरी परिसरातील रूपवास गावातील रहिवासी निक्कीचं लग्न ९ डिसेंबर २०१६ रोजी कसाना परिसरातील सिरसा येथील रहिवासी विपिनशी झालं होतं. निक्कीची मोठी बहीण कांचन हिचंही सिरसा येथील रोहित भाटीशी लग्न झालं होतं. लग्नापासून दोन्ही बहिणींना हुंड्यासाठी छळ सहन करावा लागत होता.
या प्रकरणात निक्कीची बहीण कांचन हिने एफआयआर दाखल केला आहे, ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की सासू दया, सासरे सत्यवीर, पती विपिन आणि दीर रोहित भाटी हे निक्कीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. ही हत्या प्लॅनिंग करून करण्यात आली आहे. निक्कीचे कुटुंब आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहे.
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
निक्कीचे वडील भिखारी सिंह म्हणाले की, आधी हुंड्यात स्कॉर्पिओ देण्यात आली, नंतर विपिन आणि त्यांच्या कुटुंबाने बुलेट मागितली. तीही मागणी आम्ही पूर्ण केली. तरीही सासरच्यांनी निक्कीचा छळ सुरूच ठेवला. माझ्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. भिखारी सिंह यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, योगी सरकार आहे, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवला पाहिजे. जर असं झालं नाही तर आम्ही उपोषण करू.
या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये निक्कीचा ६ वर्षांचा मुलगा म्हणत आहे की, पप्पांनी मम्मीला लाईटरने जाळून मारलं. निक्कीच्या मृत्यूनंतर परिसरात संताप आहे. कुटुंबाचा आरोप आहे की निक्की आणि कांचनच्या लग्नापासून सासरच्यांनी पैसे आणि महागड्या वस्तूंची मागणी केली होती.