सरकारी वकिलाने न्यायालयाच्या आवारात संपवलं जीवन; लिपिकासह न्यायाधीशांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 09:36 IST2025-08-23T09:35:30+5:302025-08-23T09:36:55+5:30
न्यायाधीश रफीक शेख व लिपिक आण्णासाहेब तायडे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप

सरकारी वकिलाने न्यायालयाच्या आवारात संपवलं जीवन; लिपिकासह न्यायाधीशांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, वडवणी (जि. बीड) : येथील सरकारी वकील विनायक लिंबाजी चंदेल (वय ४७, रा. इंदेवाडी, जि. परभणी) यांनी २० ऑगस्ट रोजी वडवणी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी एका न्यायाधीशांवर आणि लिपिकावर मनमानी कारभार, वारंवार अपमान करून मानसिक छळाचा आरोप केल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजित चंदेल (१९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जून २०२५ पासून वडवणी कोर्टातील नवनियुक्त न्यायाधीश रफीक शेख व लिपिक आण्णासाहेब तायडे हे त्यांना मानसिक त्रास देत होते. अपमानित करणे, मनमानी काम करणे यामुळे ते सतत चिंताग्रस्त होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे विश्वजित याने म्हटले आहे.
कुटुंबीयांनी समजावले, पण...
९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या वेळी विनायक चंदेल यांनी कुटुंबीयांना हा त्रास सांगितला होता. तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी, विशेषतः आजोबांनी त्यांना समजावले होते की, ‘तू टेन्शन घेऊ नकोस, तुझी बदली होईल किंवा त्यांची बदली होईल.’ मात्र, त्रास कमी झाला नाही.
आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी
- पोलिसांनी मृतदेहाची झडती घेतली असता, विनायक चंदेल यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत त्यांनी न्यायाधीश रफीक शेख आणि क्लार्क तायडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते.
- तसेच त्यांनी न्याय मिळवण्यासाठी मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांना विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी ई-मेलद्वारे ही माहिती दिली आहे. चिठ्ठीतील हस्ताक्षर आणि सही आपल्या वडिलांचीच असल्याचा दावा विश्वजित चंदेल यांनी केला आहे.