गुगलवरचा सर्च बँक ग्राहकाला पडला महागात; कस्टमर केअर नंबरने अडीच लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 09:21 PM2021-06-24T21:21:38+5:302021-06-24T21:22:20+5:30

Fraud Case :फसवणुकीची अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Google's search bank cost customers dearly; Two and a half lakh duped with customer care number | गुगलवरचा सर्च बँक ग्राहकाला पडला महागात; कस्टमर केअर नंबरने अडीच लाखांचा गंडा

गुगलवरचा सर्च बँक ग्राहकाला पडला महागात; कस्टमर केअर नंबरने अडीच लाखांचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्दे माधवी मनोहर काळे रा. शिवनेरी सोसायटी आर्णी रोड यवतमाळ यांचे स्टेट बॅंकेत खाते आहे.

यवतमाळ : बॅंक खात्याशी निगडित ॲपबद्दल घर बसल्या माहिती मिळविणे चांगलेच महागात पडले. बॅंकेच्या कस्टमर केअरचा नंबर गुगलवर सर्च केला. त्या नंबरवर संपर्क केल्यानंतर संबंधित ग्राहकाला दोन लाख ३७ हजाराचा फटका बसला. ठगाने परस्पर खात्यातून रक्कम वळती केली. दुसऱ्या दिवशी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्या ग्राहकाला पश्चातापाशिवाय पर्याय उरला नाही. फसवणुकीची अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.


माधवी मनोहर काळे रा. शिवनेरी सोसायटी आर्णी रोड यवतमाळ यांचे स्टेट बॅंकेत खाते आहे. बॅंकेच्या पेपल ॲपबद्दल माहिती मिळविण्यासाठी त्यांनी धडपड केली. स्टेट बॅंकेचा अधिकृत कस्टमर केअर नंबर माहीत नसल्याने गुगलवर त्याचा शोध घेतला. त्यांना ९३३९०७४२१ हा कस्टमर केअर नंबर असल्याची माहिती मिळाली. या क्रमांकावर माधवी काळे यांनी संपर्क केला. समोरच्या व्यक्तीने त्यांना मोबाईलमध्ये क्वीक शेअर ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. नंतर बॅंक पासबुकचा फोटो अपलोड करायला लावला. पुढे एटीएम पीन मागून घेतला. त्यानंतर फोनवर असलेल्या ठगाने तुमचे काम झाले ॲप लवकरच सुरू होईल, असे सांगून काॅल कट केला. मात्र नंतर माधवी काळे यांच्या खात्यातून दोन लाख ३७ हजारांची रक्कम परस्पर काढल्याचे दोन दिवसाने निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली.

सायबरच्या अलर्टकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम

कुठल्याही कस्टमर केअरचा नंबर हा मोबाईलच्या दहा अंकी आकड्याचा नसतो. शक्यतो गुगलवर कस्टमर केअरचे नंबर शोधूच नये, असे सायबर सेलकडून वारंवार सांगितले जाते. त्याबाबत जनजागृतीही करण्यात येते. मात्र याकडे सुशिक्षितांकडूनही दुर्लक्ष केले जाते. याचा फायदा ठगांना होतो. आपल्या बॅंक खात्याची चावीच सरळ त्यांच्या हातात न कळतपणे दिली जाते. जनजागृती करूनही फसणारे कायम आहे.

Web Title: Google's search bank cost customers dearly; Two and a half lakh duped with customer care number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.