नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी, उपराजधानीत फेब्रुवारीत हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 18:28 IST2022-03-01T18:26:25+5:302022-03-01T18:28:06+5:30
Nagpur : नागपूरमध्ये गेल्या फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची एकही घटना घडलेली नाही. त्यामुळं किमान फेब्रुवारी 2022 मध्ये तरी क्राईम कॅपिटल नागपूर हत्यामुक्त शहर झाले आहे.

नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी, उपराजधानीत फेब्रुवारीत हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही
- सुरभी शिरपूरकर
नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर गेल्या काही वर्षांत हे क्राईम कॅपिटल म्हणून चर्चेत येत होतं. नागपूर शहरात गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ पोलीस प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत होती. परंतू नागपूर पोलिसांनी यावर विशेष उपाययोजना आखून या घटनांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे. नागपूरमध्ये गेल्या फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची एकही घटना घडलेली नाही. त्यामुळं किमान फेब्रुवारी 2022 मध्ये तरी क्राईम कॅपिटल नागपूर हत्यामुक्त शहर झाले आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या आकड्यांनुसार देशात सर्वाधिक हत्या होत असलेल्या शहरांमध्ये नागपूरचं नाव आघाडीवर होतं. त्यातच काही महिन्यांपूर्वी नागपूर शहरात हत्याकांडाच्या काही घटना समोर आल्या. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. या नंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील पाचही झोनचे पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखेला त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी व्यक्तींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांना आता काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. नागपूर पोलिसांनी फूट पेट्रोलिंग, बिट मार्शल सक्षमीकरण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची टीम तैनात करून गुन्हेगारांवर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. याचसोबत महिलांवर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी दामिनी पथक सक्रिय होते. दामिनी पथकामार्फत महिलांच्या सुरक्षेवरही भर देण्यात आला.