सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...! ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:06 IST2025-12-10T12:05:57+5:302025-12-10T12:06:43+5:30
प्रवासादरम्यान रात्री त्यांना झोप लागली आणि पहाटे कल्याण स्टेशनजवळ पोहोचण्यापूर्वी त्यांना जाग आली. त्यांनी पाहिले असता, बर्थखाली लॉक केलेली बॅग जागेवरून गायब झाली होती.

सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...! ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेस मध्ये ६ आणि ७ डिसेंबरच्या मध्यरात्री एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. गोरेगाव (मुंबई) येथील एका सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याचे तब्बल ५ कोटी ५३ लाख रुपये (सुमारे ५ किलो) किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने एसी कोचमधून चोरीला गेले आहेत. विशेष म्हणजे, बर्थखाली चेन लावून सुरक्षित ठेवलेली बॅग तोडून चोरट्यांनी ही चोरी केली आहे.
गोरेगावचे रहिवासी असलेले व्यापारी अभयकुमार जैन (वय ६०) हे सोलापूरहून आपल्या मुलीसह एसी कोच ए-१ मधून मुंबईला परतत होते. व्यवसायाच्या कामासाठी आणलेले सुमारे ४,४५६ ग्रॅम (४.४५६ किलो) वजनाचे मौल्यवान दागिने त्यांनी एका ट्रॉली बॅगमध्ये ठेवले होते. सुरक्षेसाठी ही बॅग त्यांनी सीटखाली चेनने लॉक केली होती.
प्रवासादरम्यान रात्री त्यांना झोप लागली आणि पहाटे कल्याण स्टेशनजवळ पोहोचण्यापूर्वी त्यांना जाग आली. त्यांनी पाहिले असता, बर्थखाली लॉक केलेली बॅग जागेवरून गायब झाली होती. या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला. जैन यांनी तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हाय-प्रोफाइल चोरीचा संशय
चोरीची किंमत आणि एसी कोचमध्ये घुसून बॅगेची चेन तोडून चोरी करण्याची पद्धत पाहता, पोलिसांनी ही साध्या चोरट्यांचे काम नसून, संघटित आंतरराज्यीय टोळीचे काम असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
कल्याण रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन विशेष तपास पथके तयार केली आहेत. ही पथके सोलापूर, पुणे आणि कल्याण स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, तसेच संबंधित डब्यात प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांचीही कसून चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासादरम्यान, विशेषतः वातानुकूलित डब्यांमध्येही प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.