प्रेयसीने फोनवर बोलणे बंद केले, प्रियकराने 51 वेळा स्क्रू ड्रायव्हर भोसकून हत्या केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 18:58 IST2022-12-27T18:57:37+5:302022-12-27T18:58:10+5:30
तरुणीच्या शरीराची चाळणी होईपर्यंत आरोपी स्क्रू ड्रायव्हर भोसकत होता.

प्रेयसीने फोनवर बोलणे बंद केले, प्रियकराने 51 वेळा स्क्रू ड्रायव्हर भोसकून हत्या केली
छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोनवर बोलणे बंद केल्याने नाराज प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. 20 वर्षीय तरुणीला आरोपीने स्क्रू ड्रायव्हरने 51 वेळा भोसकले. कोरबाचे पोलीस अधीक्षक विश्वदीपक त्रिपाठी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. गुन्हा दाखल करण्यात आला असून बेपत्ता आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीच्या घरात पोहोचला तेव्हा पीडिता घरात एकटीच होती. तिच्या किंकाळ्या कमी करण्यासाठी त्याने तिचे तोंड उशीने दाबले आणि तिच्यावर स्क्रू ड्रायव्हरने 51 वेळा हल्ला केला. तिचा श्वास थांबेपर्यंत आणि शरीराची चाळणी होईपर्यंत आरोपी स्क्रू ड्रायव्हर भोसकत होता. या हत्येनंतर संपूर्ण बेड रक्ताने लाल झाला होता. पीडितेच्या भावाने घरी आल्यावर बहिणीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहिली आणि पोलिसांना सांगितले.
याप्रकरणी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जशपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आरोपीची तीन वर्षांपूर्वी पीडितेशी मैत्री झाली. तेव्हा तो प्रवासी बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होता. आरोपी नंतर कामानिमित्त गुजरातमधील अहमदाबाद शहरात गेला. यानंतर दोघेही फोनवर संपर्कात राहिले. पण, तरुणीने अचानक त्याच्याशी फोनवर बोलणे बंद केले. यामुळे नाराज आरोपीने तरुणीची निर्घृण हत्या केली.