माणुसकीला काळीमा! कारमधून प्रवास, फिरण्याचं आमिष अन्...; हैदराबादमध्ये जर्मन तरुणीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 20:12 IST2025-04-01T20:12:06+5:302025-04-01T20:12:21+5:30
हैदराबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

माणुसकीला काळीमा! कारमधून प्रवास, फिरण्याचं आमिष अन्...; हैदराबादमध्ये जर्मन तरुणीवर बलात्कार
हैदराबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका २२ वर्षीय जर्मन तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी तिच्या एका मित्रासोबत शहरात फिरायला गेली होती. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये राहणारा एका मुलगा तरुणीसोबत इटलीमध्ये शिकत होता. दोघांमध्ये मैत्री होती. ती मित्राला भेटण्यासाठी ४ मार्च रोजी हैदराबादला आली. सोमवारी दोघेही शहरात फिरायला गेले होते. याच दरम्यान त्याला मिरपेट परिसरात एक कार चालक भेटला. त्याच्यासोबत पाच अल्पवयीन मित्र आधीच उपस्थित होते. त्यांनी तरुणीला आणि तिच्या मित्राला फिरण्याचं आमिष दाखवलं आणि कारमध्ये बसण्याची ऑफर दिली.
तरुणी मित्रासोबत कारमध्ये बसली. कार चालक त्यांना शहरातील अनेक ठिकाणी घेऊन गेला. यावेळी या लोकांनी फोटो काढले आणि व्हिडीओ बनवले. संध्याकाळी कार चालकाने त्याच्या मित्रांच्या मदतीने तरुणीच्या मित्राला जबरदस्तीने कारमधून खाली उतरवलं. तिला संध्याकाळी ७.३० वाजता शहराच्या बाहेरील ममीडिपल्ली भागात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
तरुणीने तिच्या मित्राला याबद्दल माहिती दिली. दोघेही पोलीस स्टेशनला पोहोचले. तिथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं. बीआरएस एमएलसीच्या कविता यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी पावलं उचलण्याची मागणी केली आहे. तसेच हे सर्व चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे.