चोपडा येथे गावठी कट्टा हस्तगत, सांगलीच्या तीन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 00:03 IST2020-12-10T23:59:42+5:302020-12-11T00:03:09+5:30
Crime News : विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली येथील तीन जणांना चोपडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चोपडा येथे गावठी कट्टा हस्तगत, सांगलीच्या तीन जणांना अटक
चोपडा जि. जळगाव : विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली येथील तीन जणांना चोपडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चोपडा शिवारात ही कारवाई करण्यात आली.
संदीप आनंदा निकम (२८, बुधगाव, ता. मिरज), विशाल गणेश कांबळे (२६) आणि प्रदीप अरुण साबळे (३५, दोघे रा. माधवनगर, ता. मिरज) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलिसांनी गुरुवारी दुपारी चोपडा शिवारात चारचाकी (एमएच ५०/ए-०८०७) वाहन अडविले. आत बसलेल्या तीनही झडती घेतली असता त्यांच्याकडे ३० हजार किंमतीचा गावठी बनावटीचा एक कट्टा, ३ हजार रूपये किमतीचे तीन जिवंत काडतुसे, ३ लाख रूपये किंमतीची कब्जातील चारचाकी वाहन व १३ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल हँडसेट असा एकूण ३ लाख ४६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
पोकॉ. मिलिंद सपकाळे यांच्या फिर्यादीवरून तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.