भर कोर्टात गँगवॉर; वकिलाच्या वेशात येऊन गँगस्टरला केले ठार; दिल्लीत न्यायाधीशांसमोरच गुंडावर झाडल्या गोळ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 06:24 AM2021-09-25T06:24:05+5:302021-09-25T06:24:42+5:30

एखाद्या चित्रपटातील भयावह कथानक असावे अशी ही घटना शुक्रवारी दुपारी रोहिणी न्यायालयात घडली. गोळीबार होताच न्यायालयात गोंधळ उडाला. सगळ्यांचा भीतीने थरकापच उडाला. लोक जीवाच्या भीतीने पळू लागले.

Gangwar in court; Came in the guise of a lawyer and killed the gangster in Delhi | भर कोर्टात गँगवॉर; वकिलाच्या वेशात येऊन गँगस्टरला केले ठार; दिल्लीत न्यायाधीशांसमोरच गुंडावर झाडल्या गोळ्या 

भर कोर्टात गँगवॉर; वकिलाच्या वेशात येऊन गँगस्टरला केले ठार; दिल्लीत न्यायाधीशांसमोरच गुंडावर झाडल्या गोळ्या 

googlenewsNext

विकास झाडे - 


नवी दिल्ली : येथील रोहिणी भागातील न्यायालयात दोन बदमाशांनी अंदाधुंद गोळीबार करून कुख्यात गुंड जितेंद्र मान ऊर्फ गोगीची न्यायाधीशांसमोरच हत्या केली. वकिलाचे कपडे घालून आलेल्या या बदमाशांनी गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्या दोघांचाही खात्मा झाला आहे.

एखाद्या चित्रपटातील भयावह कथानक असावे अशी ही घटना शुक्रवारी दुपारी रोहिणी न्यायालयात घडली. गोळीबार होताच न्यायालयात गोंधळ उडाला. सगळ्यांचा भीतीने थरकापच उडाला. लोक जीवाच्या भीतीने पळू लागले.

जितेंद्र मान ऊर्फ गोगी याला कोर्टरूममध्ये सुनावणीसाठी आणण्यात आले होते. एका वकिलाने सांगितले की, न्यायाधीशांच्या समोरच बदमाशांनी गोगीवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात दोन्ही हल्लेखोरांचाही जागीच मृत्यू झाला. 

पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका महिला वकिलाच्या पायाला गोळी लागली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करीत आहेत. रोहिणी भागातील सरकारी इमारती आणि न्यायालयातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

पूर्ववैमनस्यातून गोळीबार
- रोहिणी कोर्ट बार असोसिएशनचे माजी सचिव सत्यनारायण शर्मा म्हणाले की, अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमागे गँगवॉर असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये गोगीचा प्रतिस्पर्धी टिल्लू टोळीचा सहभाग असल्याची पोलिसांना भीती आहे. 
- टिल्लू टोळीचे गोगीशी खूप जुने वैर असल्याचे सांगितले जाते. गोगी व टिल्लू ताजपुरिया टोळी डोकेदुखी ठरली होती. 
- गोगीला विशेष कक्षाने गेल्या वर्षी मार्चमध्ये गुरुग्राममधून पकडले होते. त्यावेळी त्याच्यावर साडेसहा लाखांचे बक्षीस होते. टिल्लू-गोगी हे महाविद्यालयात शिकत असताना शत्रू बनले, त्यांनी एका प्रसिद्ध गायकाची हत्याही केली होती.

गोगीवर झाडल्या चार गोळ्या
पोलिसांनी सांगितले की, गोगीला रोहिणी कोर्ट रूम २०७ मध्ये संबंधित खटल्याची सुनावणी होती. गोगीला मारण्यासाठी आलेल्या राहुल फंडा व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी तिथल्यातिथे गोळ्या घालून ठार केले. गोगीसह तीन बदमाशांचा मृत्यू झाला आहे. आपणास कुणीही ओळखू नये म्हणून दोघे आरोपी न्यायालयात वकिलाचा वेश परिधान करून आले होते. गोगीला तीन ते चार गोळ्या लागल्या.

पोलिसांना ५० हजार -
दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी या घटनेनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पोलिसांनी न्यायालयात प्रसंगावधान बाळगल्याने फार नुकसान झाले नाही. हल्लेखोरांना ठार करणाऱ्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
 

Web Title: Gangwar in court; Came in the guise of a lawyer and killed the gangster in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.