Gang-rape of a girl in front of a friend; Four convicts sentenced to life imprisonment | मित्रासमोरच तरुणीवर केला सामूहिक अत्याचार; चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

मित्रासमोरच तरुणीवर केला सामूहिक अत्याचार; चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

औरंगाबाद : सुंदरवाडी शिवारात मित्रासोबत बोलत बसलेल्या तरुणीला मारहाण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्या चार आरोपींना विशेष सत्र न्यायाधीश एस.एस. भीष्मा यांनी शुक्रवारी (दि.१८) जन्मठेप आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी एक लाख रुपये भरपाईपोटी पीडितेला देण्याचे आदेशात म्हटले आहे. शेख तय्यब शेख बाबूलाल (३२), रा. सुंदरवाडी, तालेब अली शौकत आली, शेख जमील शेख हुसेन बागवान आणि शेख अश्पाक शेख हुसेन (२२), अशी आरोपींची नावे आहेत 

जालना रस्त्याच्या बाजूला २७ आॅगस्ट २०१५ रोजी २२ वर्षांची तरुणी मित्रासोबत गप्पा मारत असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. दोघांनी तरुणीला रस्त्यालगत असलेल्या शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मित्राने स्वत:ची सुटका करून घेतली व तो जालना रस्त्यावर धावत आला असता त्याला गस्तीवर असलेली पोलीस व्हॅन दिसली. त्याने पोलिसांना हकीकत सांगितली. पोलीस येत असल्याचे पाहून ते चौघे पळून गेले होते. एमआयडीसी सिडको पोलिसांनी पीडितेला घाटी रुग्णालयात हलविले. घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना घटनेची माहिती कळविली.

पीडितेच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी गुन्ह्याचा तपास करून शेख तय्यब शेख बाबूलाल (३२), रा. सुंदरवाडी, तालेब अली शौकत आली, शेख जमील शेख हुसेन बागवान आणि शेख अश्पाक शेख हुसेन (२२, तिघे रा. हिमायतनगर) या चौघांना अटक केली. पोलिसांनी  तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने वरील  शिक्षा आणि दंड ठोठावला.

Web Title: Gang-rape of a girl in front of a friend; Four convicts sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.