चेन्नईत मित्राचा खून, नालासोपाऱ्यात अडकला, फरार आरोपीला ५ वर्षांनंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 14:38 IST2023-05-14T14:37:55+5:302023-05-14T14:38:34+5:30
वालीव पोलिसांनी बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी रघू मंडल हा वसईतील कंपनीमध्ये काम करीत असल्याची माहिती मिळवली त्याला ताब्यात घेतले.

चेन्नईत मित्राचा खून, नालासोपाऱ्यात अडकला, फरार आरोपीला ५ वर्षांनंतर अटक
नालासोपारा : चेन्नईत मित्राचा खून करून पळून गेलेल्या भूमिगत आरोपीला ५ वर्षांनंतर वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तामिळनाडू पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.
चेन्नईस्थित तम्बरम शहरातील टी - १९ केलमबक्कम पोलिस ठाण्यातील हत्येच्या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी रघू दूघई मंडल याचा तामिळनाडू पोलिस मागील ५ वर्षांपासून सातत्याने शोध घेत होते. वालीव पोलिसांनी बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी रघू मंडल हा वसईतील कंपनीमध्ये काम करीत असल्याची माहिती मिळवली त्याला ताब्यात घेतले.
ही कामगिरी उपायुक्त पोर्णिमा चौगुले -श्रींगी, सहायक आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे, निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलिस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, अभिजित गढरी यांनी पार पाडली आहे.
नेमकी घटना काय?
आरोपी रघू मंडल व त्याचा मित्र अनिल चौधरी हे दोघे चेन्नईतील कंपनीत एकत्र काम कामाला होते. तसेच एकाच रूममध्ये राहात होते; कालांतराने दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून भांडण झाले. त्याचा राग धरून १४ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री रघू मंडलने अनिलचा धारदार चाकूने गळा कापून खून केला होता. तामिळनाडू पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले होते.