'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:56 IST2025-11-07T10:55:51+5:302025-11-07T10:56:28+5:30
सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियावर एक सीक्रेट ग्रुप तयार केला आणि लोकांची १५० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक केली.

फोटो - ABP News
जर तुम्हीही शेअर बाजारातून मोठा नफा कमावण्याचा विचार करत असाल, तर आधीच सावध व्हा, कारण पोलिसांनी "मनी हाइस्ट" या वेब सिरीजपासून प्रेरणा होऊन लोकांची फसवणूक करणाऱ्यांना तिघांना अटक केली आहे. सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियावर एक सीक्रेट ग्रुप तयार केला आणि लोकांची १५० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक केली. अर्पित, प्रभात आणि अब्बास अशी आरोपींची नावं आहेत.
लवकर पैसे कमावण्याच्या शोधात असलेल्या आरोपींनी चुकीच्या मार्गांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी "हाय रिटर्न इन्व्हेस्टमेंट" नावाचा एक व्हॉट्सएप ग्रुप तयार केला आणि काही चिनी नागरिकांना उच्च परताव्याचे आमिष दाखवून आकर्षित केलं. उच्च परताव्याच्या आमिषाने लोकांनी शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली, परंतु जेव्हा त्यांचे पैसे काढण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी त्यांची खाती ब्लॉक केली. पोलिसांच्या मते, या व्यक्तींनी देशभरातील ३०० हून अधिक लोकांची ऑनलाईन फसवणूक केली.
१५० कोटींची फसवणूक
पोलीस तपासात असं दिसून आलं की, व्यवसायाने वकील असलेल्या अर्पितने सीक्रेट ग्रुपमध्ये त्याचं नाव प्रोफेसर असं ठेवलं होतं. प्रभात वाजपेयी हे एमसीए पदवीधर आहेत. अब्बासने सिम कार्ड आणि बँक खाती पुरवली. देशभरात झालेल्या २३ कोटी रुपयांच्या डिजिटल फसवणुकीसाठी हे लोक जबाबदार आहेत. तक्रारीनुसार, एका प्रसिद्ध वित्तीय कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं भासवून फसवणूक करणाऱ्यांनी एका व्यक्तीची २१.७७ लाख रुपयांची फसवणूक केली. या व्यक्तीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करताच, तपास पथकाने ताबडतोब तांत्रिक विश्लेषण सुरू केलं. बँक व्यवहार, कॉल डिटेल्स आणि आयपी लॉग वापरून, पोलिसांनी नोएडा, उत्तर प्रदेश आणि गुवाहाटीमधील फसवणूक करणाऱ्यांचं लोकेशन शोधलं, ज्यामुळे १५० कोटी रुपयांची सायबर फसवणूक उघडकीस आली.
डिजिटल पुरावे केले जप्त
अटकेनंतर, पोलिसांनी नोएडा आणि सिलिगुडीमध्ये छापे टाकले. पोलिसांनी ११ मोबाईल, १७ सिम कार्ड, १२ बँक पासबुक/चेकबुक, ३२ डेबिट कार्ड आणि ऑनलाइन व्यवहारांचे असंख्य व्हॉट्सएप चॅट्स आणि स्क्रीनशॉटसह मोठ्या प्रमाणात डिजिटल पुरावे जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिक्योर द गेम आणि पिंटॉस नावाच्या सीक्रेट व्हॉट्सएप ग्रुपद्वारे काम करत होते. पोलिसांना चुकवण्यासाठी, आरोपी आलिशान हॉटेल्सचा वापर करत होते, जिथून ते फोनद्वारे त्यांचे सायबर गुन्हे करत होते.