जादा परतावा देण्याच्या आमिषाने ६० लाखांची फसवणूक; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 20:58 IST2022-02-13T20:57:25+5:302022-02-13T20:58:06+5:30
नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार, धमकी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

जादा परतावा देण्याच्या आमिषाने ६० लाखांची फसवणूक; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जादा परतावा देण्याच्या आमिषाने एका २३ वर्षीय विवाहितेची ६० लाख २५ हजारांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच घडली. कहर म्हणजे यातील भामट्याने या विवाहितेचा विनयभंगही केला आहे. याप्रकरणी हार्दिक गुंगलीया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी रविवारी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या व्यवसायात पैशांची मदत केल्यास सहा महिन्यांमध्ये पन्नास लाख रुपयांचे एक कोटी किंवा सव्वाकोटी रुपये देतो, असे आमिष हार्दिक याने यातील पीडित महिलेला दाखविले होते. त्याच आमिषातून त्याने २७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये तिला माहेरून मिळालेले, सासरी तसेच नातेवाइकांकडून मिळालेले असे ३९ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने तसेच हार्दिकचा मित्र फरहान ऊर्फ इरफान यांच्याकडून व्याजाने ११ लाख असे ५० लाख रुपये तसेच त्यावरील व्याज दहा लाख २५ हजार रुपये असे ६० लाख २५ हजार रुपये हार्दिकला दिले. मात्र, त्याने तिचे सोन्याचे दागिने घेऊन दीडपट अथवा दुप्पट रक्कम परत न करता फसवणूक केली. ते दागिनेही गहाण ठेवून त्याचा अपहार केला. त्यानंतर हे दागिने देण्याच्या नावाखाली तिचा विनयभंगही केला. नंतर पुन्हा दहा लाखांची मागणी करून ते दिले नाही तर कुटुंबामध्ये तसेच समाजात बदनामी करण्याची धमकीही दिली. या प्रकाराने त्रस्त झाल्याने अखेर या पीडितेने याप्रकरणी १० फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार, धमकी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.