जळगावमध्ये चार पोलीस तडकाफडकी निलंबित, धाडीतील लाखोंची रक्कम गायब केल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 23:16 IST2019-05-18T23:16:22+5:302019-05-18T23:16:47+5:30
धरणगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीतील घरात सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला टाकलेल्या धाडीतील लाखो रुपये गायब झाले होते.

जळगावमध्ये चार पोलीस तडकाफडकी निलंबित, धाडीतील लाखोंची रक्कम गायब केल्याचा ठपका
जळगाव - धरणगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीतील घरात सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला टाकलेल्या धाडीतील लाखो रुपये गायब झाले होते. या प्रकरणी ठपका ठेवत चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी शनिवारी सायंकाळी ही धडक कारवाई केली. एकाच वेळी चार कर्मचारी निलंबित झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
शिवाजी बाविस्कर ( धरणगाव ), संतोष पारधी, (चोपडा शहर) , हितेश बेहरे (चोपडा ग्रामीण) आणि तुषार साळुंखे (वाहन चालक, चोपडा उपविभागीय कार्यालय) अशी निलंबित कर्मचाºयांची नावे आहेत.
धरणगाव तसेच चोपडा शहरातील चार आणि अडावद येथील एका ठिकाणी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी धाड टाकली होती. धरणगावच्या धाडीत साधारण १० ते १५ लाखांची रोकड आढळली होती. मात्र या गुन्ह्यात अवघे पावणे तीन लाख जप्त झाल्याचे दाखविण्यात आले. उर्वरित रक्कमेबाबतची माहिती समोर येत नसल्यामुळे संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणाविषयी तक्रार आल्यानंतर डीवायएसपी सौरभ अग्रवाल यांनी चौकशी केली आणि हवाल पाठविला होता. त्यावर ही कारवाई करण्यात आली.